मुंबई : पाकिस्तानचे हल्ले परतवून लावत असताना भारतीय सैन्य दलातील २ जवान शहीद झाले आहेत. यात मुंबईतील रहिवाशी असलेले आणि मूळचे आंध्र प्रदेशचे मुरली नाईक, तर दुसरे जवान दिनेश शर्मा यांना पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण प्राप्त झाले. गोळीबारात जखमी झाल्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे दरम्यान दिनेश शर्मा यांच्या रहिवासासंदर्भातील माहिती अद्याप मिळालेली नाही.
मुंबई येथील मुरली नाईक हे दि. ९ मे रोजी पहाटे पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात शहीद झाले आहेत. मुंबई येथील घाटकोपर येथे त्यांच्या शहीद झाल्याचे बॅनर लावले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी ट्विट करत शहीद जवान मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नाईक हे सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवाशी होते. देशासाठी बलिदान देणा-या मुरली नाईक यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, नाईक कुटुंबीयांप्रती सहवेदना आहेत असे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले नाईक कुटुंब हे कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी सदरची झोपडपट्टी पुनर्विकासात गेल्याने त्यांची घरे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे, सध्या नाईक यांचे कुटुंब आंध्र प्रदेशाला राहण्यास गेले आहे. मुंबईतील घाटकोपर वार्ड क्रमांक १३३ मध्ये मुरली नाईक यांच्या शहीद झाल्याचे बॅनर लावण्यात आले असून त्यांना स्थानिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.