बार्शी : तालुक्यातील महागाव गावाजवळील तलावात दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे बार्शी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अनिल दत्तात्रय सपाटे(रा. आलीपूर रोड, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मोठा मुलगा गणेश (वय २६) हा १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता आपल्या मित्रासोबत गावाला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता. त्याच्या छोट्या भावाने ही माहिती वडिलांना दिली. त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद लागत होता. अनिल सपाटे यांनी गणेशच्या मोबाईलवर पुन्हा फोन लावला असता पांगरी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी फोन उचलला. त्यांनी सांगितले की, महागाव गावाजवळील तलावाच्या पुलाजवळ दोन पुरुषांचे मृतदेह आढळले आहेत आणि गणेश सपाटे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय, पांगरी येथे यावे असे सांगितले.
अनिल सपाटे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ग्रामीण रुग्णालय, पांगरी येथे पोहोचून मृतदेहांची ओळख पटवली असता, त्यातील एक मृतदेह गणेश अनिल सपाटे यांचा तर दुसरा मृतदेह शंकर उत्तम पटाडे (वय ४०, रा. यशवंत नगर, तुळजापूर रोड, बार्शी) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. गणेश आणि शंकर यांचा मृत्यू कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दोघे तलावाजवळ कसे गेले? पाण्यात पडून बुडाले की इतर काही कारण होते ? याचा पोलिस तपास सुरु आहे.
गणेश सपाटे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण कुटुंब चकली व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते. तसेच, शंकर पटाडे यांच्या कुटुंबावरही दु:खाचा आघात झाला आहे. या घटनेमुळे बार्शी आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिस अधिक तपास करत आहेत.