23.4 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रधनगर आरक्षण उपोषणातून २ तरुण बेपत्ता

धनगर आरक्षण उपोषणातून २ तरुण बेपत्ता

  ‘जलसमाधी’ घेत असल्याची चिठ्ठी सापडली; तपास सुरू

अहमदनगर :
राज्यभरात सध्या धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागात धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अहमदनगर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू आहे. अहमदनगरच्या नेवासा फाटा येथे गेल्या ९ दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून सरकार दखल घेत नसल्याने जलसमाधी घेण्याचा इशाराही या आंदोलकांनी दिला होता. अशातच आता या उपोषणामधील दोन तरुण बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहमदनगरच्या नेवासा फाटा येथे सुरू असलेल्या धनगर आरक्षणाच्या उपोषणामधून दोन आंदोलक बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. या आंदोलकांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. अशातच आता दोन आंदोलक तरुण बेपत्ता झाले असून आम्ही जलसमाधी घेत आहोत, यास सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याची चिठ्ठीही आढळून आली आहे.

प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळसे अशी या दोन्ही धनगर आंदोलक तरुणांची नावे आहेत. दोघेही काही तासांपासून गायब असून आम्ही जलसमाधी घेत आहोत, यास सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, अशा आशयाची चिठ्ठी अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरासंगम येथील गोदावरी नदीकाठी सापडली आहे. तसेच गोदावरी पुलावर त्यांच्या चपलाही आढळून आल्या आहेत.

दरम्यान, या दोन्ही तरुणांचे मोबाईल फोनही बंद लागत असल्याने त्यांनी नदीत उडी घेतल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेने आंदोलकांसह, परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून पोलिस आणि नागरिक दोघांचाही शोध घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR