नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ऑनलाइन देणग्या गोळा करण्यासाठी काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी (१८ डिसेंबर) डोनेट फॉर देश नावाने क्राउड फंडिंग मोहीम सुरू केली होती. पक्षाने आपल्या १३८ व्या स्थापना दिवसाच्या १० दिवस आधी २८ डिसेंबर रोजी ही मोहीम सुरू केली. आश्चर्याची बाब म्हणजे काँग्रेसने सुरू केलेल्या या मोहिमेवर दोन दिवसांत अनेक सायबर हल्ले झाले आहेत. या काळात २० हजार ४०० सायबर हल्ले झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये १३४० वेळा डेटा चोरीचा प्रयत्न करण्यात आला. बहुतांश हल्ले देशाबाहेरून झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १,१३,७१३ लोकांनी ऑनलाइन मोडद्वारे २ कोटी ८१ लाख रुपयांची देणगी काँग्रेसला दिली आहे. देणगी देणा-यांपैकी ८० टक्के लोकांनी डिजिटल मोडचा वापर केला आहे. तसेच देणगी वेबसाइटला १.१२ कोटी वेळा भेट देण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह ३२ जणांनी निधीसाठी एक लाख रुपयांहून अधिक देणगी दिली आहे.
त्याचबरोबर ६२६ जणांनी १३ हजार रुपयांची देणगी दिली. आगामी काळात काँग्रेस सभांमध्ये क्यूआर कोड लावून देणगी मागितली जाणार आहे. तसेच लोक पैशाच्या बदल्यात राहुल गांधींची स्वाक्षरी असलेली वस्तू खरेदी करू शकणार आहेत. पहिल्या दोन दिवसांत ज्या पाच राज्यांमधून सर्वाधिक देणग्या मिळाल्या त्यामध्ये महाराष्ट्रातून ५६ लाख, राजस्थानमधून २६ लाख, दिल्लीतून २० लाख, यूपीमधून १९ लाख आणि कर्नाटकमधून १८ लाख देणग्यांचा समावेश आहे.