हॉँगकॉँग : डीपफेक तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग चिंतेत असताना हाँगकाँगमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून एका व्यक्तीने मल्टिनॅशनल कंपनीला तब्बल २५.६ मिलियन डॉलर्सला लुटले आहे.
हाँगकाँग पोलिसांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, स्कॅमरने व्हिडिओ कॉलमध्ये कंपनीतील कर्मचा-यांना पैसे ट्रान्सफर करण्याचे आदेश दिले. हा स्कॅमर कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिका-याच्या (सीएफओ) रुपात दिसत होता. तो केवळ दिसायलाच ख-या अधिका-याप्रमाणे नव्हता, तर त्याचा आवाजही अगदी सारखाच होता अशी माहिती कंपनीच्या इतर कर्मचारी आणि अधिका-यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीपफेकचा अशा प्रकारे वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी एका व्यक्तीला दुस-या व्यक्तीने डीपफेक व्हिडिओच्या माध्यमातून फसवण्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एका संपूर्ण ऑफिसलाच गंडवल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.
या स्कॅमचे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ फायनान्स ऑफिसरच नव्हे, तर व्हिडिओ कॉलमध्ये दिसणारे इतर काही अधिकारी देखील डीपफेकच्या मदतीने तयार केलेले होते. या सर्वांनी कंपनीतील ख-या अधिका-यांना एकूण १५ ट्रान्झॅक्शन करण्याचे आदेश दिले. ही एकूण रक्कम सुमारे २०० कोटी रुपये होती. हे पैसे हाँगकाँगमधील सहा वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये पाठवण्यात आले.
अधिका-यांचे डीपफेक रुप तयार करण्यासाठी हॅकर्सनी या अधिका-यांच्या पब्लिकली उपलब्ध असणा-या माहितीचा वापर केला. व्हिडिओ, फोटो अशा गोष्टींचा वापर करून ते अधिकारी बोलताना त्यांचा आवाज कसा येतो, त्यांचे हावभाव कसे असतात या सगळ्याची माहिती हॅकर्सना सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून मिळाली.
या कंपनीचे नाव हाँगकाँग पोलिसांनी उघड केलेले नाही. ही मल्टिनॅशनल कंपनी असून, कंपनीचे सीएफओ यूकेमध्ये होते. यावेळी त्यांच्या नावाने एक ई-मेल कंपनीमध्ये आला होता. हा मेल खोटा असल्याचा संशय एका कर्मचा-याला आल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर स्कॅमर्सने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मदत घेतली. यामध्ये कित्येक ओळखीचे चेहरे पाहिल्यामुळे कर्मचा-यांची खात्री पटली की हा व्हिडिओ कॉल खरा आहे.