अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील करवंदरा गावात हळदीच्या कार्यक्रमाच्या जेवणातून दोनशेहून अधिक लोकांना विषबाधा झाली आहे. या प्रकरणानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्या व्यक्तींमध्ये सात बालकांचा समावेश आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा गावातील सोमा दगडू भांगरे यांचा मुलगा सखाराम याचा विवाह पाडोशी येथील रामभाऊ साबळे यांच्या मुलीशी निश्चित झाला होता. नवरदेवाकडे हळदीचा कार्यक्रम बुधवारी रात्री असल्याने दोनशे नातेवाईक जेवणासाठी आले होते.
मात्र रात्री जेवल्यानंतर काही व-हाडींना रस्त्यातच उलट्या, जुलाब होऊ लागल्यामुळे त्यांना तातडीने संगमनेर, नाशिक, राजूर रुग्णालय, कोहणे, खिरविरे रुग्णालयात हलवण्यात आले. विषबाधा झालेल्या रुग्णांत महिला आणि मुलांचाही समावेश आहे. आता सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.