19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्र२१ ‘लाडक्या बहिणी’ जाणार विधानसभेत

२१ ‘लाडक्या बहिणी’ जाणार विधानसभेत

३६३ महिला होत्या निवडणूक रिंगणात महायुतीच्या २० महिला प्रतिनिधी

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची मतमोजणी प्रक्रिया शनिवारी (दि. २३) पार पडली. भाजप-१३२, शिंदेंची शिवसेना-५७ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांसह महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले. एकूण २८८ आमदार संख्­या असणा-या विधानसभेत यंदा २१ महिला उमेदवार विजयी झाल्­या आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी राज्यातून एकूण ३६३ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या. सत्ताधारी महायुतीकडून ३० महिला उमेदवारांना संधी देण्यात आली होती. (भाजप-१८, शिंदे शिवसेना-८, अजित पवार-४) यामध्ये १२ विद्यमान आमदार होत्या. महाविकास आघाडीकडून देखील ३० महिला उमेदवारांना निवडणूक तिकिट देण्यात आले होते. (शरद पवार-११, काँग्रेस-९, ठाकरेंची शिवसेना-१०) त्यांच्यामध्ये २ विद्यमान आमदार होत्या. तर अपक्ष महिला उमेदवार देखील या निवडणुकीत मैदानात होत्या.

सर्वाधिक महिला आमदार ‘भाजप’च्या
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी निवडणुकीच्या मैदानात असलेल्या एकूण ३६३ महिला उमेदवारांपैकी २१ महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. सत्ताधारी महायुतीच्या २० तर विरोधी पक्षातील केवळ १ महिला आमदार विधानसभेला निवडून आली आहे. यापैकी सर्वाधिक भाजपच्या जवळपास १४ महिला निवडून आल्या असून, त्यापैकी १० महिला उमेदवार या विद्यमान आमदार आहेत.

भाजपच्या सर्वाधिक १४ महिला उमेदवार विजयी झाल्या, ज्यात १० फेरनिवडून आलेल्या आहेत: श्वेता महाले (चिकली मतदारसंघ), मेघना बोर्डीकर (जिंतूर), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), मंदा म्हात्रे (बेलापूर), मनीषा चौधरी (दहिसर), विद्या ठाकूर (गोरेगाव), माधुरी मिसाळ (पर्वती), मोनिका राजळे (शेवगाव) आणि नमिता मुंदडा (केज).

भाजपला मिळाल्या ४ नवीन आमदार
निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केलेल्या मतदानाच्या निकालानुसार, भाजपच्या चार नवीन महिला विजयी झाल्या आहेत. यामध्ये श्रीजया चव्हाण (भोकर), सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व), स्नेहा पंडित (वसई) आणि अनुराधा चव्हाण (फुलंब्री) यांचा समावेश आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येकी ४ महिला
सत्ताधारी शिवसेनेच्या तिकिटावर मंजुळा गावित (साक्री) आणि संजना जाधव (कन्नड) या दोन महिलांनी निवडणूक जिंकली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या तिकिटावर सुलभा खोडके (अमरावती), सरोज अहिरे (देवळाली), सना मलिक (अनुशक्तीनगर) आणि अदिती तटकरे (श्रीवर्धन) या महिल्या विजयी झाल्या आहेत. विरोधी पक्षाकडून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड (धारावी) या एकमेव महिला आमदार आहेत.

यंदा संख्या रोडावली
२०१९ मध्ये मुख्य प्रवाहातील पक्षांनी ४५ महिला उमेदवार उभे केले होते. त्यापैकी फक्त २४ महिला उमेदवार जिंकल्या. २८८ सदस्यांच्या विधानसभेत फक्त २४ महिला आमदार म्हणजेच फक्त ८ टक्के महिला आमदार होत्या. तर यावेळी २१ महिला उमेदवार जिंकल्याने ही टक्केवारी ७ टक्क्यांवर आली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये राज्यात ३३ टक्के महिला आरक्षणाचा ठराव पास करण्यात आला. तेव्हा सभागृहात २८८ पैकी ९६ महिला आमदार असणं अपेक्षित असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR