सोलापूर – सुमारे ४० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या सोलापूर जिल्ह्यासाठी सध्या ६६५ एसटी गाड्या मार्गावर असून त्यातील २१७ एसटी गाड्या २५ ते २८ मार्च या दरम्यान स्क्रॅपमध्ये निघणार आहेत. त्यामुळे केवळ ४४८ गाड्यांवर प्रवासी सेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या सोलापूर विभागाला नव्या गाड्यांची प्रतीक्षा राहणार आहे. गाड्यांच्या कमतरतेमुळे लग्नसराई व उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नव्या गाड्यांची खरेदी झाली नाही. ज्या काही नव्या गाड्या आल्या त्या मोठ्या शहरांदरम्यानच सोडण्यात आल्या. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये नव्या गाड्या आल्याच नाहीत. महानगरांकडे धावलेल्या जुन्या व खिळखिळ्या झालेल्या गाड्या ग्रामीण भागांतील प्रवाशांसाठी पाठविण्यात आल्या.
सोलापूर विभागामध्ये सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, कुडूवाडी, पंढरपूर, सांगोला, करमाळा, अकलूज, मंगळवेढा हे नऊ आगार आहेत. या सर्व आगारांमध्ये ६६५ एसटी गाड्या प्रवाशांच्या सेवेत आहेत. त्यातील बहुतांश गाड्या स्क्रॅपमध्ये काढण्याच्याच क्षमतेच्या आहेत. काही गाड्यांच्या खिडक्यांच्या काचा निखळल्या असून काही गाड्यांचे पत्रे फाटलेले दिसतात. प्रवासी सेवेदरम्यान मार्गातच अनेक गाड्या बंद पडतात. महामंडळाने जुन्या व कालबा झालेल्या गाड्या स्क्रॅपमध्ये काढण्याचे धोरण स्वीकारले आहे.
त्यानुसार राज्यभरातील अनेक आगारांमधील जुन्या गाड्या प्रवासी सेवेतून बाजूला काढण्यात येत आहेत. नव्या गाड्यांची खरेदी सुरू असून नव्या गाड्या महामंडळाच्या ताफ्यात येतील त्यानुसार प्रत्येक आगारांकडे काही गाड्या पाठविल्या जात आहेत. बार्शी आगाराला दोनच दिवसांपूर्वी नव्या दहा गाड्या मिळाल्या. या महिनाअखेर अक्कलकोटसाठी नव्या दहा गाड्या मिळणार आहेत. स्क्रॅपमध्ये जेवढ्या गाड्या निघतील त्याप्रमाणात नवीन गाड्या मिळाव्यात, यासाठी विभागीय व्यवस्थापकांकडून प्रयत्न चालू आहेत.एसटीमधून ५५ प्रवासी प्रवास करू शकतात.
परंतु एसटी गाड्यांची संख्या कमी असल्याने ग्रामीण भागात एका गाडीतून ६५ ते ७० जण प्रवास करतात. महिलांना अर्धे तिकीट, ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना तसेच शाळकरी मुलींना मोफत प्रवास असल्याने महामंडळाच्या गाड्यांना तुडुंब गर्दी होत आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत. सोलापूर विभागाला नव्या गाड्या अधिक संख्येने मिळाव्यात यासाठी विभागीय अधिकारी अमोल गोंजारी हे लोकप्रतिनिधींकडे संपर्क साधून आहेत. त्यांनी सरकार दरबारी पाठपुरावा करून सोलापूरला अधिकाधिक गाड्या मिळवून द्याव्यात, यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत.