भोपाळ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे पुत्र आणि काँग्रेस खासदार नकुलनाथ यांच्यासमवेत भाजपचे कमळ हाती घेणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाचे ठिकाण आणि वेळ ठरविण्यात येणार आहे. कमलनाथ यांच्यासारखा अनुभवी आणि राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळलेला नेता भाजपमध्ये जाणार असल्याने काँग्रेसला मध्य प्रदेशात मोठा धक्का बसणार आहे.
ज्या कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेसने नुकतीच झालेली मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक लढवली होती, तेच कमलनाथ आता भाजपमध्ये प्रवेश का करत आहेत आणि यामागची त्यांची रणनीती कशी असणार आहे, याबाबतही आता चर्चांना उधाण आले आहे. कमलनाथ हे भाजपमध्ये प्रवेश करताना काँग्रेसला मोठे भगदाड पाडण्याच्या तयारीत असून त्यांनी त्यादृष्टीने तयारीही केल्याची माहिती आहे.
पक्षात येताना कमलनाथ यांनी काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार घेऊन यावेत, अशी भाजपची अपेक्षा आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपला खरंतर सत्तेसाठी आमदारांची आवश्यकता नाही. मात्र आमदार फोडून काँग्रेसला खिळखिळी करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीट वाटपाचे अधिकार कमलनाथ यांच्याकडेच होते. त्यामुळे काँग्रेसचे जे काही आमदार निवडून आले आहेत, त्यातील बहुतांश आमदार कमलनाथ समर्थक आहेत. या आमदारांना फोडणं, कमलनाथ यांच्यासाठी फारसं कठीण नाही. काँग्रेसचे ६३ पैकी २२ आमदार कमलनाथ यांच्यासोबत जाण्यास उत्सुक असल्याचे समजते. २२ पेक्षा जास्त आमदार सोबत आल्यास त्यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवायला सांगितले जाऊ शकते.
सर्वांना तिकीट देण्याची अट
माझ्यासोबत काँग्रेसचे जे काही आमदार येतील, त्यांनी राजीनामा देऊन पोटनिवडणूक लागल्यानंतर त्या सर्वांना तिकीट दिले जावे अशी अट कमलनाथ यांच्याकडून ठेवण्यात आल्याची माहिती आहे. ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले होते तेव्हाही असा पॅटर्न राबवला गेला होता.