सोलापूर : जिवाची बाजी लावून, काही दिवस कुटुंबाकडे न जाता, तासंतास तपासाच्या मोहिमेवरील सोलापूर शहर पोलिसांनी तब्बल १९३ जणांना चोरट्याने पळविलेला त्यांचा ऐवज परत केला. त्यावेळी त्या सर्वांच्या चेह-यावर हास्य फुलल्याचे पाहायला मिळाले. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या हस्ते १९३ जणांचा एक कोटी १० लाखांचा ऐवज परत करण्यात आला.
सोलापूर शहरातील विविध भागांतून चोरट्यांनी चोरून नेलेल्या २२ दुचाकींचा पोलिसांनी काही दिवसांत शोध घेतला. याशिवाय चोरीला गेलेला एक ट्रॅक्टर एक जीप, १२३ मोबाईल, एक टॅब व ३५ ते ४० लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केले. पोलिस आयुक्तालयात त्या सर्वांना बोलावून त्यांचा चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्यात आला. त्यावेळी वृद्ध महिलांच्या चेह-यावर हास्य दिसून आले. यावेळी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त अजित बो-हाडे, विजय कबाडे, डॉ. दीपाली काळे यांच्यासह सहायक आयुक्त व सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
मुद्देमाल परत करण्याच्या कार्यक्रमप्रसंगी काहीजण म्हणाले, आम्ही परगावी गेल्यावर बंद घरातून चोरट्याने मणीमंगळसूत्र, अंगठ्या, कर्णफुले, गंठण, लहान मुलांचे दागिने चोरून नेले होते. अनेक दिवसांनंतरही चोरटा सापडत नव्हता, त्यामुळे आता आम्हाला आमचे दागिने, मुद्देमाल परत मिळेल ही आशा सोडून दिली होती. पण, आज तो आम्हाला परत मिळतोय, असे म्हणत त्यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले. पोलिस आयुक्तांनीही सर्व अधिकारीअंमलदारांचे या कामगिरीबद्दल कौतुक केले.