नवी दिल्ली : दिल्लीतील वाढते प्रदूषण आणि बदलती जीवनशैली यांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या ताज्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये श्वसनाशी संबंधित आजारांमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या २०२३च्या तुलनेत वाढली आहे, तर हृदयविकार हे मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आकडेवारीचा सरासरी आढावा घेतल्यास, २०२४ मध्ये दिल्लीत श्वसनाशी संबंधित आजारांमुळे ९,२११ मृत्यू झाले. म्हणजेच, राजधानीत दररोज सुमारे २५ जणांचा मृत्यू श्वसनाशी संबंधित आजारांमुळे झाला, तर २०२३ मध्ये ८,८०१ मृत्यू झाले. म्हणजेच, एका वर्षात श्वसनविकारांमुळे मृत्यूंची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, दमा, न्यूमोनिया, फुफ्फुसांचा कर्करोग आणि क्षयरोग (टीबी) हे प्रमुख कारणे आहेत. प्रदूषित हवा, धूळ-धूर, विषारी वायू आणि अस्वस्थ जीवनशैली यामुळे ही समस्या तीव्र होत आहे. चिंतेची बाब म्हणजे, हे आजार आता केवळ वृद्धांपुरते मर्यादित न राहता तरुण आणि लहान मुलांनाही प्रभावित करत आहेत.
हृदयविकार ठरले मृत्यूचे सर्वात मोठे कारण
२०२४ मध्ये परिसंचरण तंत्राशी संबंधित आजार हे दिल्लीतील मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरले. २०२४ मध्ये २१,२६२ मृत्यू झाले, तर २०२३ मध्ये १५,७१४ जणांचा यामुळे बळी गेला. एका वर्षात तब्बल ५,५०० हून अधिक मृत्यूंची वाढ नोंदवण्यात आली आहे. यामध्ये हार्ट अटॅक, स्ट्रोक, धमन्यांतील अडथळे आणि हृदयविकार अपयश (हार्ट फेल्युअर) यांचा समावेश आहे.
संक्रामक आजारांमुळे मृत्यूत घट; मात्र धोका कायम
२०२४ मध्ये संक्रामक आणि परजीवी आजार हे मृत्यूचे दुसरे मोठे कारण ठरले. २०२४ मध्ये १६,०६० मृत्यू झाले, तर २०२३ हा आकडा २०,७८१ होता. मागील वर्षाच्या तुलनेत मृत्यूंची संख्या कमी झाली असली, तरी दूषित पाणी, अपुरी स्वच्छता आणि दाट लोकसंख्या यामुळे धोका अजूनही कायम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

