22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीला ४८ पैकी २६ जागा?

महाविकास आघाडीला ४८ पैकी २६ जागा?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणात महाराष्ट्रातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सर्वेक्षणात महाविकास आघाडीने भाजप-शिंदे-अजित पवार गटावर मात केल्याचे दिसत असून विरोधी आघाडीला ४८ पैकी २६ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजप महायुतीला ४०.५ टक्के मते तर काँग्रेस आघाडीला ४४.५ टक्के मते मिळत असल्याचे दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले असताना देशातील विविध संस्थांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज बांधणारे सर्व्हे समोर येत आहेत. या अगोदर काल टाइम्स नाऊचा सर्व्हे समोर आला होता. आज ‘इंडिया टुडे मूड ऑफ नेशन’चा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेतून इंडिया आघाडीच्या पारड्यात महायुतीपेक्षा अधिक जागा दाखविल्या आहेत.

इंडिया टुडेचा ‘द मूड ऑफ द नेशन्स फेब्रुवारी २०२४’ हा सर्व्हे सर्व लोकसभेतील ३५,८०१ प्रतिसादकर्त्यांच्या आधारावर बेतलेला आहे. १५ डिसेंबर २०२३ ते २८ जानेवारी २०२४ या काळात हे सर्वेक्षण केले गेले. इंडिया आघाडीला २६ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करत असताना भाजपा आणि एनडीए आघाडीला २२ जागा मिळू शकतील, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या कामगिरीवर नजर टाकली असताना काँग्रेस पक्षाला चांगला पाठिंबा मिळत असल्याचा दावा सर्व्हेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला १२ जागा मिळतील, असे दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागच्या दोन निवडणुकात काँग्रेसची कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. २०१४ साली काँग्रेसचे केवळ २ खासदार निवडून आले होते तर २०१९ साली बाळू धानोरकर यांच्या रुपाने केवळ एक जागा काँग्रेसला मिळाली होती.

या अगोदर टाइम्स नाऊ मॅट्रीज या वृत्तसंस्थेचाही सर्व्हे समोर आला. ज्यामध्ये एनडीएला ३९ तर इंडिया आघाडीला केवळ ९ जागा मिळतील, असा अंदाज मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला. दरम्यान मॅट्रीजच्या सर्व्हेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, सर्व्हे काहीही आले तरी लोकांची मानसिकता मोदींना पाठिंबा देण्याची बनली आहे. त्यामुळे मोदीजी आणि त्यांना पाठिंबा देणा-या प्रत्येकाला जनता निवडून देईल आणि गतवेळेपेक्षा आमच्या अधिक जागा निवडून येतील, असे सांगितले.

ठाकरे-पवार गटाला १४ जागा!
शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांना एकत्रित १४ जागा मिळतील, असे सर्व्हेच्या माध्यमातून सांगण्यात आले. मतदानाच्या टक्केवारीवर नजर टाकली असता इंडिया आघाडीला ४५ टक्के तर एनडीएला ४० टक्के मतदान मिळेल, असे भाकीत वर्तविले आहे.

मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ पेक्षा अधिक मतदान घेण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात किमान १० टक्के मतदान वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लोकसभेत बोलत असताना पंतप्रधान मोदींनी जाहीर केले की, भाजपा ५१ टक्के मतदान घेऊन ३७० जागा मिळवेल तर एनडीए आघाडी एकत्रितपणे ४०० हून अधिका जागा घेईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR