30.6 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरे गटाचे ११ उमेदवार निश्चित!

ठाकरे गटाचे ११ उमेदवार निश्चित!

मुंबई : प्रतिनिधी
एकीकडे महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीसंबंधी जागावाटपाची चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाने आपले ११ उमेदवार निश्चित केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांचे नाव अंतिम करण्यात आले असून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून विनायक राऊत तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांच्या नावावरही शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. यातील ११ वा उमेदवार म्हणून बुलडाण्यात नरेंद्र खेडेकर यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

आगामी लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचे शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने ठरवले आहे. त्यासाठी जागावाटपाचीही चर्चा सुरू आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाने ४८ पैकी २३ जागांची मागणी केली आहे. या जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याआधीच शिवसेना ठाकरे गटाकडून ११ जागांवर नावे फायनल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकसभेसाठी ठाकरे गटाने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेत झालेल्या बंडाचे मूळ ठाण्यात असून ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याचे मानले जाते. त्या ठिकाणाहून खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात येणार असून त्यांनी तयारीही सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी अनेकजण उत्सुक होते. त्यामध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचेही नाव समोर आले होते. पण ठाकरे गटाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे.

बुलढाण्यातून खेडेकर लढणार
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांना लोकसभेचे तिकीट दिले जाणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे २१ आणि २२ फेब्रुवारीला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यावेळी ते नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची घोषणा करू शकतात.

हे आहेत संभाव्य उमेदवार
– शिर्डी : भाऊसाहेब वाकचौरे
– बुलढाणा : नरेंद्र खेडेकर
– ईशान्य मुंबई : संजय दिना पाटील
– रायगड : अनंत गीते
– रत्नागिरी-सिंधुदुर्ग : विनायक राऊत
– दक्षिण मुंबई : अरविंद सावंत
– वायव्य मुंबई : अमोल कीर्तीकर
– संभाजीनगर : चंद्रकांत खैरे
– धाराशिव : ओमराजे निंबाळकर
– परभणी : संजय जाधव
– ठाणे : राजन विचारे

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR