सोलापूर : अंगणवाड्या डिजिटल झाल्याने बालकांना दृकश्राव्यच्या माध्यमांतून शिक्षण घेता येणार आहे. बौद्धीक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. या उद्दिष्ट्यातून उरलेल्या सर्व अंगणवाड्या लवकरात लवकर डिजिटल करण्यात येतील.असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगीतले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यात लोकसहभाग, डीपीसी निधी, सीएसआर निधीतून २८० अंगणवाड्या डिजिटल बनविल्या आहेत.
त्यामुळे त्या अंगणवाड्यांतील बालकांना आता दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. जिल्ह्यात मागील दोन वर्षांत ५८० अंगणवाड्या डिजिटल बनविण्याचे उद्दिष्टये महिला व बालकल्याण विभागाने ठेवले होते. त्यातील आतापर्यंत २८० अंगणवाड्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकसहभाग, सीएसआर निधी, जिल्हा परिषदेचा सेस निधी, डीपीसी निधी वापरण्यात आला आहे. डिजिटल अंगणवाड्यांमध्ये स्क्रीन टिव्ही, शालेय शिक्षण अभ्यासक्रम किट, थ्रीडी कार्ड, शैक्षणिक तक्ते, पूर्व शालेय संच, बालकांना बसण्यासाठी अॅक्टीवेटी टेबल यासह अनेक साहित्य देण्यात आले आहे. तसेच बोलक्या भिंतीतून बालकांचा अभ्यास व्हावा, यासाठी अंगणवाड्यांच्या सर्व भिंतीवर अभ्यासक्रम विविध चित्रे काढली आहेत.
दरम्यान, डिजिटल अंगणवाडींची संख्या येत्या काळात आणखी वाढण्याची गरज आहे.
त्यामुळे लोकसहभाग, जिल्हा परिषदेचा सेस निधी, डीपीसी निधी आणि सीएसआर निधी वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात सन २०२३-२४ मध्ये १९१ डिजिटल अंगणवाड्या केल्या आहेत. मात्र, सन २०२४-२५ मध्ये फक्त ८९ अंगणवाड्या डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे डिजिटल अंगणवाड्यांचे काम गतीने करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे. स्क्रीन टीव्ही, शालेय शिक्षण अभ्यासक्रम किटथ्रीडी कार्ड, शैक्षणिक तक्ते, पूर्व शालेय संच, बालकांना बसण्यासाठी अॅक्टीवेटी टेबल यासह साहित्य डिजिटल अंगणवाड्यांमध्ये आहे.
बोलक्या भिंतीतून बालकांचा अभ्यास होण्यासाठी अंगणवाड्यांच्या भिंतीवर अभ्यासक्रम, विविध चित्रे काढली आहेत. अक्कलकोट २४, बार्शी १४, वैराग १४, करमाळा-२५, टेंभूर्णी १३, माढा १६, माळशिरस २१, अकलूज १८, मंगळवेढा १९, मोहोळ २१, उत्तर सोलापूर १३, पंढरपूर २९, सांगोला १५, कोळा-१४, दक्षिण सोलापूर – २४ अशी एकूण २८० प्रकल्प निहाय डिजिटल अंगणवाडी संख्या आहे.