चेन्नई : प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी तामिळनाडू सरकारमधील सार्वजनिक बांधकाम आणि महामार्ग विभागाचे राज्यमंत्री ईव्ही वेलू यांच्या निवास्थानावर छापा टाकला होता. राज्यात प्राप्तिकर विभागाची शोध मोहीम अजूनही सुरूच आहे. प्राप्तिकर विभागाने ईव्ही वेलू आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिसरातून २९ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. सलग पाचव्या दिवशी अनेक परिसरांची झडती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आज शोधाचा पाचवा दिवस आहे आणि तामिळनाडूचे मंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या परिसरात छापे अजूनही सुरू आहेत. तसेच रोख जप्तीचे प्रमाण वाढू शकते. अनेक आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंत्री वेलू यांच्याशी संबंधित परिसरातून २२ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. झडतीमध्ये कागदपत्रे सापडली आहेत, त्यात कोट्यवधींची करचोरी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
चेन्नईतील दोन आघाडीच्या बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयात अजूनही झडती सुरू आहे. अप्पास्वामी रिअल इस्टेट आणि कॅसाग्रँड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड अशी त्यांची नवे आहेत. येथून सात कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आयकर विभागाने शुक्रवारी मंत्री वेलू यांच्या मुलाच्या निवासस्थानी आणि तिरुवन्नमलाई येथील अरुणाई मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये करचुकवेगिरीच्या संभाव्य प्रकरणात झडती घेतली होती.