22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयसर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच ३ दलित न्यायाधीश!

सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच ३ दलित न्यायाधीश!

कॉलेजियमच्या शिफारशीनंतर आठवड्यात निर्णय गवई, रविकुमार नंतर वराळेंची वर्णी

नवी दिल्ली : कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश पी बी वराळे यांना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी गुरुवारी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून शपथ दिली. यासंदर्भातील कार्यक्रम सुप्रीम कोर्ट परिसरात आयोजित करण्यात आला होता. न्यायमूर्ती वराळे यांच्या सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश म्हणून नियुक्तीला केंद्र सरकारने बुधवारी परवानगी दिली होती.

सुप्रीम कोर्टामध्ये एकूण न्यायमूर्तींच्या पदांची संख्या ३४ इतकी मंजूर आहे. वराळे यांच्या नियुक्तीनंतर सुप्रीम कोर्टामधील न्यायाधीशांचा कोटा पूर्ण झाला आहे. तसेच वराळे यांच्या नियुक्तीमुळे सुप्रीम कोर्टात इतिहास रचला गेला आहे. पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टामध्ये सध्या तीन दलित समूदायातील न्यायमूर्ती नियुक्त आहेत. दलित समूदायातील इतर दोन न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती सी.टी. रविकुमार हे आहेत. महिन्याच्या सुरुवातीला सरन्यायाधीशांच्या नेतृत्त्वातील कॉलेजियमने वराळे यांच्या नावाची शिफारस केली होती. वराळे हे हायकोर्टातील वरिष्ठ न्यायमूर्ती असल्याचे लक्षात घेण्यात आले होते. ते हायकोर्टातील एकमेव न्यायमूर्ती आहेत जे अनुसूचित जातीचे आहेत. याचाही उल्लेख सुप्रीम कोर्टाकडून करण्यात आला होता. मागील महिन्यात न्यायमूर्ती एस के कौल हे सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे एक पद रिक्त झाले होते. कॉलेजियमने शिफारस केल्यानंतर केंद्र सरकारने आठवड्याभरात त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. संबंधित मंत्रालयाने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करत राष्ट्रपतींना कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी बी वराळे यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करताना आम्हाला आनंद होत आहे.

कोण आहेत न्यायमूर्ती वराळे?
न्यायमूर्ती वराळे यांचा जन्म २३ जून १९६३ रोजी निपाणी येथे झाला आहे. त्यांचे आजोबा बळवंतराव वराळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्तीय होते असे सांगितले जाते. बाबासाहेबांच्या सांगण्यावरुनच ते आताच्या छ. संभाजीनगरमध्ये राहायला आले होते. प्रसन्ना वराळे यांचे वडील भालचद्र वराळे हे देखील जिल्हा न्यायाधीश होते. त्यांचाच वारसा प्रसन्ना यांनी पुढे जपला. प्रसन्ना यांचे पूर्ण शिक्षण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात झाले आहे. त्यांची १८ जुलै २००८ रोजी मुंबईच्या हायकोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांना १५ ऑक्टोंबर २०२२ मध्ये कर्नाटक हायकोर्टात मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. आता ते सुप्रीम कोर्टात नियुक्त झाले आहेत.

न्यायमूर्ती गवई होणार सरन्यायाधीश
सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार दलित आहेत. न्यायमूर्ती गवई देशाचे सरन्यायाधीशही होतील. न्यायमूर्ती बीआर गवई हे मे ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत सरन्यायाधीश असतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR