बीड : शिवराज दिवटे या युवकाला अपहरण करून मारहाण झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू, अशी धमकी मारहाण करणा-या आरोपींनी दिल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज शिवराज दिवटे याची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्याचा वडीलांशीही त्यांनी चर्चा केली.
परळीत १९९२ पासून एकहाती सत्ता असल्याने या सत्तेचाच हा माज असल्याची संतप्त प्रतिक्रिया सोनवणे यांनी दिली. या अपहरण आणि हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी करतानाच पोलिस अधीक्षक दर्जाचा एक विशेष अधिकारी आणि कर्मचारी या प्रकरणाच्या चौकशीसाठी द्या, यासाठी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंर्त्यांना भेटणार असल्याचे सोनवणे यांनी माध्यमांना सांगितले. शुक्रवारी परळीतील गुन्हेगारांच्या एका टोळक्याने शिवराज दिवटे या तरुणाला उचलून जवळच्या जंगलात नेते लाठ्याकाठ्या, बेल्ट, रॉडने बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केली.
परळीजवळील रत्नेश्वर मंदिराच्या आवारातील जंगलात हा प्रकार घडला. दहा ते बारा जणांच्या टोळक्याने ही मारहाण केली, त्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी आंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी शिवराज दिवटे याची आज भेट घेतली. तसेच त्याच्या वडिलांशी देखील चर्चा केली.
५ आरोपींना २० मेपर्यंत पोलिस कोठडी
काल अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी पाच आरोपींना २० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. रोहित मुंडे (रा. डाबी), प्रशांत कांबळे (रा. परळी), सुरज मुंडे (रा. टोकवाडी) व स्वराज गित्ते (रा. परळी) यांच्यासह अनोखळी दहा आरोपी फरार आहेत. फरार आरोपींना अटक करा, सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करा, या मागणीसाठी बीड बंदची हाक तर बीड-परळी रोडवरील गोपीनाथ गडाच्या रस्त्यावर ग्रामस्थांनी रास्तारोको केला आहे.