मुंबई : विजेच्या खांबावर कन्नड अभिनेता यश याच्या ३८ व्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावत असताना तीन जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तर या घटनेत आणखी तिघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर तालुक्यातील सुरनागी गावात मध्यरात्री एक वाजता झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत हरिजन (२४), मुरली नदूविनामानी (२०) आणि नवीन गाजी (२०) अशी मृतांची नावे आहेत. गदगचे पोलिस अधीक्षक बाबासाहेब नेमागौडा म्हणाले, ‘ वाढदिवसाचा बॅनर लावत असताना तिघांना विजेचा शॉक लागला तर तिघे जखमी झाले. बॅनरवर एक धातूची फ्रेम होती जी विद्यूत तारेच्या संपर्कात आली. याप्रकरणी लक्ष्मेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही याची चौकशी करू.’
दरम्यान, नवीन कुमार गौडा असे आज (दि.८) आपला ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. तो कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने २००७ मध्ये ‘जंबडा हुडुगी’ मधून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. ‘रॉकी’ (२००८), ‘गुगली’ (२०१३) आणि ‘मि. आणि मिसेस रामाचारी’ (२०१४) या चित्रपटात त्याने काम केले आहे.