बुलडाणा : जिल्ह्यातील चिखली-जाफराबाद महामार्गावर भरधाव दुचाकीचे नियंत्रण सुटून दुचाकी झाडावर आदळून भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. चिखली-जाफराबाद मार्गावर भोकरवाडीजवळ हा अपघात झाला.
अपघातानंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला पडली असून दुचाकीवरून प्रवास करणारे तिघेही मित्र झाडाच्या शेजारीच पडल्याचे दिसून येत आहे. स्पोर्ट्सबाईकने ते वेगात जात असताना दुचाकी झाडावर धडकल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन तरुणांचा मृत्यू झाला आहे. भोकरवाडीजवळ झालेल्या या भीषण अपघातात रोहित चाबुकस्वार, शुभम चाबुकस्वार आणि सोनू उसरे हे तीन तरुण जागीच ठार झाले आहेत.
अपघातानंतर तात्काळ चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर, तिघांचेही मृतदेह चिखली येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत. दरम्यान, तिघेही एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते, विशेष म्हणजे तिघांपैकी एकानेही हेल्मेट वापरले नसल्याने हा अपघात त्यांच्या जीवावर बेतला आहे. अपघातामधील तिघेही तरुण संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. आता, पोलिसांकडून तपास करण्यात येत असून नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे.