बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलविरोधी मोहीम सुरु आहे. येथे रविवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर चार जवानही चकमकीत गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते.
बिजापूरमध्ये नक्षलविरोधी कारवाईदरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये आतापर्यंत ३१ नक्षलवादी मारले गेले आहेत. हे सर्व ३१ माओवादी वर्दीत होते. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांवर ब-याच दिवसांपासून कारवाई केली जात आहे. गेल्या ४० दिवसांत सुरक्षा दलांनी ५६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच, बिजापूरच्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे.
यावर्षी आतापर्यंत चार मोठ्या नक्षलवादी कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिल्या चकमकीत ५, दुस-या चकमकीत १२, तिस-या चकमकीत ८ नक्षलवादी मारले गेले आणि आज ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. म्हणजेच गेल्या ४० दिवसांत सुरक्षा दलांनी ५६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. हे सर्व नक्षलवादी बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यानात बस्तर एरिया कमिटीच्या कार्यकर्त्यांविरुद्धच्या कारवाईत मारले गेले आहेत.
१४ महिन्यांत २७४ नक्षलवादी ठार
सुरक्षा दल गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून नक्षलवाद्यांवर कारवाई करत आहेत. गेल्या १४ महिन्यांत छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी २७४ नक्षलवादी मारले आहेत. याशिवाय ११६६ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ९६९ जणांनी आत्मसमर्पण केले आहे. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये ज्या ठिकाणी चकमक झाली, ते ठिकाण बिजापूर जिल्ह्यातील फरसेगड परिसर आहे. येथील राष्ट्रीय उद्यानाचे जंगल नक्षलवाद्यांचा सक्रिय गड मानले जाते.
अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त
बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यानात बस्तर एरिया कमिटी क्षेत्रातील जंगलात नक्षलवाद्यांविरोधात डीआरजी, एसटीएफ आणि बस्तर फायटर्स यांनी संयुक्तरित्या कारवाई केली. या कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात एके ४७, एसएलआर, आयएनएएसएएस रायफल, ३०३, बीजीएल लाँचर शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. तसेच, पुन्हा कारवाईसाठी अतिरिक्त दल पाठवण्यात आले असून शोध मोहीम सुरूच आहे.