नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून आज लोकसभेत आणि राज्यसभेत गोंधळ झाला. त्यानंतर विरोधी पक्षांच्या ३३ खासदारांना निलंबित करण्यात आले.
संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून गोंधळ घालणा-या विरोधी पक्षाच्या ३३ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामध्ये लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि इतर प्रमुख खासदारांचा समावेश आहे. आजही विरोधी पक्ष संसदेच्या सुरक्षेबाबतच्या आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. यावरून लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर या सर्व ३३ खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या काळापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. या आधी दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या १३ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात संसदेची सुरक्षा भेदून काही तरूण लोकसभेत घुसले होते. त्यानंतर त्याच मुद्द्यावरून आता विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत या मुद्यावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
संसदेत झालेल्या या गोंधळानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधी पक्षांच्या ३३ खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. संसदेच्या कामकाजात अडथळे आणल्याप्रकरणी अध्यक्षांनी गोंधळ घालणा-या ३३ खासदारांना निलंबित केले. त्यामध्ये काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, टीआर बालू आणि दया निधी मारन यांचा समावेश आहे. त्यानंतर संसदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.