मॉस्को : रशिया आणि युक्रेन, या देशांमध्ये सुरू असलेले युद्ध आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून थंड पडलेल्या युद्धात आता मोठी घडामोड घडली आहे. युक्रेनने अचानक रशियावर आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला केला आहे. युक्रेनने थेट रशियाची राजधानी मॉस्कोवर डझनभर ड्रोन डागले असून त्यात अनेक लोक जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. या हल्ल्यामुळे रशियाने अनेक उड्डाणेही वळवण्यात आली आहेत.
युक्रेनने मॉस्कोवर किमान ३४ ड्रोन डागले आहेत. २०२२ मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियाच्या राजधानीवर युक्रेनचा हा सर्वांत मोठा ड्रोन हल्ला आहे. या हल्ल्यात काहीजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. शिवाय, शहरातील तीन प्रमुख विमानतळांवरुन उड्डाणे इतरत्र वळवण्यात आली आहेत.
हवेतच ट्रोन उडवले
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, युक्रेनने हल्ला केल्यानंतर रशियन हवाई दलाने रविवारी तीन तासांत पश्चिम रशियाच्या इतर भागात ३६ ड्रोन नष्ट केले. दरम्यान, रशियाच्या फेडरल एअर ट्रान्सपोर्ट एजन्सीने सांगितले की, डोमोडेडोवो, शेरेमेत्येवो आणि झुकोव्स्की येथील विमानतळांनी किमान ३६ उड्डाणे वळवली, परंतु काही तासांनंतर उड्डाणे पुन्हा सुरू झाली. दुसरीकडे, रशियाने एका रात्रीत १४५ ड्रोन हल्ला केल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. पण, त्यांच्या हवाई संरक्षणाने त्यापैकी ६२ हाणून पाडले.