38.1 C
Latur
Friday, April 25, 2025
Homeमहाराष्ट्र३४ गिधाडे हरयाणातून महाराष्ट्रात दाखल

३४ गिधाडे हरयाणातून महाराष्ट्रात दाखल

पांढ-या पाठीची, लांब चोचीच्या गिधाडे वनविभागाकडे हस्तांतरीत

मुंबई : जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत हरयाणातील पिंजोर येथून लांब चोचीची २० आणि पांढ-या पाठीची १४ गिधाडे महाराष्ट्राच्या वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी या पक्ष्यांचे बीएनएचएसच्या पिंजोर येथील प्रजनन केंद्रातून राज्यात स्थानांतर करण्यात येत आहे.

हरयाणा वन विभाग, महाराष्ट्र वन विभाग, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी(बीएनएचएस), केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (सीझेडए) आणि वन व पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी संयुक्तपणे ही मोहीम हाती घेतली आहे. हरयाणाचे मुख्य वन्यजीव संरक्षक विवेक सक्सेना, महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव संरक्षक श्रीनिवास राव आणि बीएनएचएसचे संचालक किशोर रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र वन विभाग व बीएनएचएसची एक चमू सोमवारी पिंजोर येथे पोहोचली. यामध्ये रुंदन काटकर, डॉ. मयांक बर्डे, मनन सिंग महादेव यांचा समावेश आहे.

स्वागतासाठी केंद्र तयार
ताडोबामधील प्रभूनाथ शुक्ला, पेंच व्याघ्र प्रकल्पातील किशोर मानकार, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आदर्श रेड्डी यांनी व्याघ्र प्रकल्पांमधील केंद्रांना त्यांच्या स्वागतासाठी तयार करून ठेवले आहे. आनंद रेड्डी, भारत हाडा, जयकुमारन यांनी पक्ष्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणण्यासाठी आवश्यक व्यवस्था पूर्ण केल्या.

वातानुकूलित वाहनातून प्रवास
नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी तंदुरुस्त गिधाडे निवडण्यात आली. प्रजातीनुसार त्यांची महाराष्ट्रातील तीन व्याघ्रप्रकल्पांसाठी निवड झाली. प्रवासादरम्यान प्रत्येक गिधाड हे विशेष लाकडी पेटीत ठेवण्यात आले. त्यांना तीन वातानुकूलित टेम्पो ट्रॅव्हलरमधून आणण्याचे नियोजन करण्यात आले.

देशात चार प्रजनन केंद्र
देशातील गिधाडांची संख्या घटत असल्याने २००२ साली ‘गिधाड प्रजनन’ कार्यक्रम सुरू करण्यात आला. याअंतर्गत चार प्रजनन केंद्रांवर ८०० गिधाडांची पैदास करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने यासाठी पुढाकार घेत ताडोबा, पेंच व मेळघाट येथे विशेष केंद्र उभे केले. याचा एक भाग म्हणून एकूण ३४ गिधाडे महाराष्ट्र वन विभागाला हस्तांतरित करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR