नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्ली विमानतळावर शुक्रवारी रात्रीपासून वाईट हवामानामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली. अचानक घोंगावणारे वारे आणि धुळीच्या वादळाने विमानांच्या व्यवस्थापनावर गंभीर परिणाम झाला. परिणामी, शनिवारी ३५० हून अधिक उड्डाणांना विलंब झाला आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. लॅँडिंगला परवानगी मिळत नसल्यामुळे विमाने हवेतच जागेवर थांबली होती.
विमानांना होत असलेला विलंब आणि विमानतळावर निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीचे व्हिडीओ प्रवाशांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. शुक्रवारी रात्री वाहतूक विस्कळीत झाल्याचा परिणाम शनिवारी सायंकाळपर्यंत जाणवत होता.
इंडिगोने हवाई वाहतूक विमानांच्या गर्दीमुळे विस्कळीत झाल्याचे नमूद केले. दिल्लीतून विमान उड्डाण व विमाने उतरण्यास परवानगी मिळत नसल्याचे स्पष्ट करून केवळ तीन रन-वे सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. विमानांच्या उड्डाणांवर देखरेख करणारी वेबसाइट ‘फ्लायटरडार२४ डॉट कॉम’च्या आकडेवारीनुसार ३५० हून अधिक उड्डाणे विलंबाने झाली. सर्व विमानांचा एकूण सरासरी विलंब हा ४० मिनिटांचा होता.