मुंबई : राज्यातील एसटीच्या ५६३ बस स्थानकांच्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणाच्या अहवालात ३५१ स्थानकांच्या स्वच्छतेचा दर्जा उत्तम ठरला आहे. या सर्वेक्षणात २१२ बस स्थानकांना ५० पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. राज्यातील ३१ विभागांपैकी मराठवाड्यातील जालना, विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती व पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागांत सर्वच्या सर्व बस स्थानके चांगले गुण प्राप्त करून स्वच्छतेबाबत प्रगतिपथावर असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले.
एसटी महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणात १०० गुणांपैकी ५० पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारी बस स्थानके ही चांगल्या दर्जाची अथवा स्वच्छता अभियानामध्ये प्रगतिशील बस स्थानके म्हणून ओळखली जातात.
५० पेक्षा कमी गुण मिळालेल्या बस स्थानकांची स्वच्छता ही असमाधानकारक असल्याचे शेरे संबंधित समितीने ओढले आहेत. या अभियानांतर्गत बसस्थानक स्वच्छता व सुशोभीकरणाला ३५ गुण, प्रसाधनगृह स्वच्छतेला १५ गुण, बसच्या स्वच्छतेला २५ गुण व प्रवाशांना दिल्या जाणा-या विविध सेवा-सुविधांना २५ गुण असे १०० गुण निर्धारित करण्यात आले आहेत.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचे सहा महिने पूर्ण झाले असून उर्वरित सहा महिन्यांमध्ये होणा-या सर्वेक्षणातून सरासरी गुणांद्वारे अंतिम निकाल जाहीर होणार आहे. कोकण विभागातील ८७ पैकी ५२ बस स्थानके असमाधानकारक स्वच्छता गटात समाविष्ट असून मराठवाड्यातील ११७ पैकी ५५ बसस्थानके असमाधानकारक स्वच्छतेमध्ये गणली गेली आहेत.
दोन सर्वेक्षणातील गुणांच्या सरासरी आधारे पहिल्या सहा महिन्यांमध्ये ‘अ’ वर्गात ८० गुण प्राप्त करून जळगाव विभागातील चोपडा बस स्थानक प्रथम क्रमांकावर आहे, ‘ब’ वर्गात कोल्हापूर विभागातील चंदगड व भंडारा विभागातील साकोली ही दोन्ही बसस्थानके ८३ गुण मिळवून प्रथम क्रमांकावर आहेत, तर ‘क’ वर्गात सातारा जिल्ह्यातील मेढा बसस्थानक ८५ गुण मिळवून प्रथम क्रमांकावर आहे.