पंढरपूर : बहुचर्चित निरा देवधर प्रकल्पाच्या बंदिस्त पाइपलाइन कामास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला असून ही योजना ३५९२ कोटी रूपयांची आहे, याचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्याला होणार असून माढा लोकसभा मतदारसंघासाठी हा जिव्हाळ्याचा विषय बनला होता. याबाबतची घोषणा केंद्रीय जलशक्ती विभागाचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केली.
निरा देवधर धरण बांधून अनेक वर्षे लोटली असली तरी याच्या कालव्यांची कामे प्रलंबित आहेत. ९० हजार हेक्टर क्षेत्राला पाणी देवू शकणारा हा प्रकल्प असून याच्या डाव्या कालव्याच्या १८ व उजव्या कालव्याचे सुमारे १५८ किलोमीटरचे काम आहे. आता नव्याने प्रचलित झालेल्या व पाणी वाचविणाऱ्या बंदिस्त पाइपलाइन योजनेत हा प्रकल्प घेण्यात आला असून यासाठी लागणाऱ्या निधीपैकी ६० टक्के रक्कम केंद्र सरकार तर ४० टक्के खर्च राज्य सरकार करणार आहे. निरा देवधरच्या बंदिस्त पाइपलाइन कालवा पध्दतीमुळे भोर, खंडाळा, फलटण यासह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणार आहे.
निरा देवधर प्रकल्प हा महत्त्वाचा असून मागील सरकारांनी तो रखडवत ठेवल्याचा आरोप केंद्रीय जलशक्ती विभागाचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केला आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हावा व सहा तालुक्यांमधील शेतीला पाणी मिळावे यासाठी माढधाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा केला असल्याचे ते म्हणाले. येथील शेतीच्या प्रश्न कायमस्वरूपी मिटावा म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी सुरुवातीला सेंट्रल वॉटर कमिशनने दौरा केला. यानंतर यास तांत्रिक मान्यता देवून आता आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा दुष्काळी पट्ट्यातील भागाला होऊन तो सुजलाम सुफलाम होईल.