नवी दिल्ली : थायलंडला नवा पंतप्रधान मिळाला आहे. यावेळी थायलंडच्या संसदेने पैतोंगटार्न शिनावात्रा यांची पंतप्रधानपदासाठी निवड करण्यात आली आहे. वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी त्या थायलंडच्या पंतप्रधान झाल्या आहेत. त्या थायलंडच्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोटार्ने संविधानाचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रेथा थविसिन यांना पंतप्रधानपदावरून बडतर्फ केले होते.
सर्वोच्च न्यायालयाने माजी गुन्हेगाराला मंत्रिमंडळात स्थान देऊन नैतिक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप श्रेथा थविसिन यांच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान, थायलंडच्या नव्या पंतप्रधान पैतोंगटार्न ही थायलंडचे माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांची सर्वात लहान मुलगी आहे. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी यापूर्वी पंतप्रधानपद भूषवले आहे. वडिलांशिवाय त्यांची मावशी यिंगलक यांनीही थायलंडचे पंतप्रधानपद भूषवले आहे. पैतोंगटार्न या देशातील सर्वात तरुण आणि दुस-या महिला पंतप्रधान आहेत.
एकाच कुटुंबातील तिघांना मिळाला पंतप्रधान होण्याचा मान
दरम्यान, पैतोंगटार्न शिनावात्रा यांच्या आधी त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यही पंतप्रधान राहिले होते. त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा गेल्या वर्षीच वनवास संपवून मायदेशी परतले आहेत. गेल्या १५ वर्षांपासून ते साल्ले येथे वनवासात राहत होते. २००१ मध्ये ते पहिल्यांदा थायलंडचे पंतप्रधान झाले. पण २००६ मध्ये सत्तापालट झाल्यानंतर त्यांना हद्दपार करण्यात आले. पैतोंगटार्न थायलंडच्या राजकारणात खूप लोकप्रिय आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी जोरदार प्रचार केला होता. तेव्हा ती गरोदर होती. २०२३ च्या निवडणुकीत त्यांचा पक्ष फेउ थाई पक्ष दुस-या क्रमांकावर होता. त्यांची मावशी थायलंडच्या पंतप्रधानही राहिल्या आहेत. देशाच्या राजकारणात त्यांचे कुटुंब खूप प्रसिद्ध आहे.