सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील गावागावांतील पिण्याच्या पाण्याचे स्रोत रासायनिक व जैविकदृष्ट्या तपासण्यात आले आहेत. जैविक तपासणीत ३०७ गावातील स्रोतातील पाणी बाधित असल्याचे आढळले, पण टीसीएल पावडर टाकून पुन्हा तपासणी केली.
त्यावेळी त्या स्रोतातील पाणी पिण्यायोग्य झाल्याचे जिल्हा परिषदेने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे रासायनिक तपासणीत ३७१ स्रोतातील पाणी पिण्यायोग्य नसल्याची बाब समोर आली आहे. दरवर्षी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोतांची वर्षातून एकदा रासायनिक तपासणी केली जाते. तर वर्षातून दोनदा जैविक तपासणी देखील होते. यंदा जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील १३ हजार ८९४ पाण्याचे स्रोत तपासले. त्यात ३०७ गावांमधील स्रोत जैविकदृष्ट्या बाधित आढळले. तपासणीपूर्वी गावकरी याच स्रोतांचे पाणी पीत होते. तपासणीनंतर बाधित आढळलेल्या स्रोतांचे टीसीएल पावडरद्वारे शुद्धीकरण करण्यात आले आणि त्यानंतर फेरतपासणी केली. त्यात ते सर्व बाधित स्रोत शुद्ध झाल्याचे सांगण्यात आले.
दुसरीकडे नऊ हजार २२८ स्रोतांची रासायनिक तपासणी देखील करण्यात आली. त्यात दूषित पाणी आढळलेल्या स्रोतांची फेरतपासणी झाली. तरीपण, त्यातील ३७१ स्रोत विशेषत: गावागावातील हातपंपातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे अहवालातून समोर आले आहे. आता ते स्रोत बंद करून त्याठिकाणी पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे फलक लावण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील ८५५ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात ‘जलजीवन’ची कामे करण्यास मंजुरी मिळाली. केंद्र व राज्य सरकारच्या ५०-५० टक्के निधीतून प्रत्येक गावातील घरांना प्रतिव्यक्ती ५५ लिटर शुद्ध पाणी देण्यासाठी जलजीवन मिशनमधून नळ कनेक्शन दिले जात आहे. मात्र, सध्या किती गावांमधील कामे पूर्ण झाली आहेत, किती गावांमधील कामे सुरू आहेत, जलजीवन योजनेअंतर्गत निर्माण केलेल्या गावांमधील पाण्याचे किती स्रोत कोरडे आहेत, प्रत्येक गावातील कुटुंबांना त्या नळातून शुद्ध पाणी दिले जात आहे का?, या सर्व प्रश्नांची उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांकडेच नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. दररोज पाणी येत नाही, पाणी पिण्यायोग्य नसते अशी ओरड गावकऱ्यांची आहे.