सोलापूर : सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीने प्लास्टिक विरोधी मोहीम सुरूच आहे. दरम्यान, गेल्या १७ दिवसांत महापालिकेच्या पथकाकडून एकूण ९१७ दुकानांची तपासणी केली. ३ हजार ८३६ किलो प्लास्टिक जप्त करत २०२ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली. एकूण १० लाख २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
सोलापूर महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नियंत्रणाखाली नियोजनपूर्वक प्लास्टिक विरोधी कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, दि. २६ डिसेंबर २०२४ ते ११ जानेवारी २०२५ या १७ दिवसाच्या कालावधीत महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्य निरीक्षकांच्या पथकाने प्लास्टिक विरोधी मोहिमेत एकूण ९१७ दुकानांची तपासणी केली.
मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, अनिल चराटे यांच्या माध्यमातून महापालिकेच्या विविध ८ झोन अंतर्गत आरोग्य निरीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली. या कालावधीत विविध पथकाने एकूण ९१७ दुकाने तपासली. एकूण २०२ दुकानदारांना दंड आकारण्यात आला. एकूण ३ हजार ८३६.२ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तर एकूण १० लाख २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. विविध ८ झोन पैकी महापालिकेच्या झोन क्रमांक १ अंतर्गत या कालावधीत एकूण २४० दुकाने तपासण्यात आली. ४२ किलो प्लास्टिक जप्त केले. ४४ दुकानदारांवर कारवाई करत एकूण २ लाख २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. झोन क्रमांक एकने इतर झोनच्या तुलनेत मोठी कारवाई आणि सर्वाधिक दंड वसूल केला आहे. त्या खालोखाल झोन क्रमांक ३ अंतर्गत एकूण १२३ दुकाने तपासली. यामध्ये ३५ किलो प्लास्टिक जप्त केले तर ३४ जणांना दंड आकारण्यात आला. त्यांच्याकडून एकूण १ लाख ७० हजार दंड वसूल केला आहे.
शहरातील नागरिक व व्यापा-यांनी शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचा उत्पादन, वापर, विक्री, हाताळणी, वाहतूक व साठवणूक करू नये व वापरताना आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक तसेच फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाईल असे आवाहन अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी केले आहे.