नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. या निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च केले. सेंटर फॉर मीडिया स्टडीजने याबाबत अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, कॉमनवेल्थ ूमन राईटस् इनेशिएटिव्हने जारी केलेल्या अहवालात सर्वच राजकीय पक्षांनी मिळून ३ हजार ८६१ कोटी ५७ लाख रुपये खर्च केला आहे.
यात भाजपने सर्वाधिक १,७३७.६८ कोटी रुपये खर्च केला. हा खर्च एकूण खर्चाच्या ४५ टक्क्यांहून जास्त आहे. निवडणूक आयोगाने पक्षांकडून निवडणुकीत केलेला खर्च आणि आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम विधानसभेत झालेल्या खर्चाचा खुलासा केला आहे. काही पक्षांनी त्यांचा हिशेब दिला आहे. परंतु असेही काही पक्ष आहेत, ज्यांनी अद्याप किती पैसे खर्च केले हे सांगितले नाही. कॉमनवेल्थ ूमन राईटस् इनेशिएटिव्हने एक रिपोर्ट जारी केला आहे.
राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीत किती पैसे खर्च केले, कुठून जमवले, हे या रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. हा रिपोर्ट निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीच्या आधारे बनविण्यात आला आहे. या अहवालात २२ राजकीय पक्षांकडे निवडणूक लढण्यासाठी १८ हजार ७४२ कोटी होते. त्यात आम आदमी पार्टी, आसाम गण परिषद, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्यत्र कळघम, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन, ऑल इंडिया तृणमूल कॉंग्रेस, ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट, बिजू जनता दल, भाजप, भारतीय राष्ट्र समिती, बहुजन समाज पार्टी, कम्युनिस्ट ऑफ इंडिया (मार्क्सवादी), सीपीआय (एम), द्रविड मुन्यत्र घळघम, कॉंग्रेस, जनता दल सेक्युलर, जनता दल युनायटेड, लोक जनशक्ती पार्टी, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी, सिक्किम डेमॉक्रेटिक फ्रंट, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा, तेलुगु देशम पार्टी, युवाजन श्रमिक रायथू कॉंग्रेस पार्टी या पक्षांचा समावेश आहे.
या सर्व राजकीय पक्षांनी मिळून ३ हजार ८६१ कोटी ५७ लाख रुपये खर्च केले आहेत. त्यात भाजपने सर्वाधिक १,७३७.६८ कोटी रुपये खर्च केला. हा खर्च एकूण खर्चाच्या ४५ टक्क्यांहून अधिक आहे. पक्षाला देणगी म्हणून मिळालेले पैसे ७,४१६.३१ कोटी रुपये आहेत. भाजपला त्यात ८४.५ टक्के वाटा मिळाला आहे. याचा अर्थ भाजपला सर्वाधिक देणगी मिळाली. लोकसभा निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केल्याने भारत केवळ लोकशाही देश नाही, तर आर्थिक रणांगण बनला आहे. नेते कोट्यवधी रुपये खर्च करतात, परंतु पैसा कुठून येतो, याचा फायदा कुणाला होतो, हा प्रश्न कायम सतावत राहतो.
माध्यमांच्या जाहिरातीवर तब्बल ९९२ कोटी खर्च
माध्यमांच्या जाहिरातीवर ९९२.४८ कोटी खर्च केले आहेत. स्टार प्रचारकांच्या दौ-यावर ८३०.१५ कोटी खर्च झाला. हेलिकॉप्टर, प्रायव्हेट जेटचा वापर करण्यात आला. बॅनर, पोस्टर, होर्डिंग्जवर ३९८.४९ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
१४८४८ कोटी शिल्लक
निवडणुकीनंतर राजकीय पक्षांकडे १४ हजार ८४८ कोटी रुपये शिल्लक आहेत. हा पैसा कुठे आहे, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. भाजपसह ६ पक्षांकडे निवडणुकीपूवीच अधिक पैसे होते.
या पक्षांनी दिला नाही खर्चाचा तपशील
एकीकडे ब-याच पक्षांनी खर्चाचा तपशील दिला आहे. परंतु मोठ्या पक्षांनी जसे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, झारखंड मुक्ती मोर्चा, शिवसेना, शिरोमणी अकाली दल यांनी त्यांच्या खर्चाचा खुलासा केलेला नाही.