नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत ०-१ ने पिछाडीवर आहे. भारताने दुस-या सामन्यात चांगली सुरुवात केली आणि यशस्वी जैस्वालच्या द्विशतकामुळे पहिल्या डावात ३९६ धावा केल्या.सध्या इंग्लंडची फलंदाजी सुरू असून, २२९ धावात ८ गडी बाद झाले आहेत.
भारताने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या आहेत. भारताकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक २०९ धावांचे योगदान दिले. त्याच्याशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला ४० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. ३४ धावा करणारा शुभमन गिल संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर पहिल्या सामन्याचा हिरो असलेल्या टॉम हार्टलीला एक विकेट मिळाली.
द्विशतक ठोकणारा सर्वात तरुण तिसरा भारतीय
यशस्वी जैस्वालने २७७ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले आहे. त्याने या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली आणि एकट्याने भारताची धावसंख्या ३९६ वर पोहोचवली. कसोटीत भारतासाठी द्विशतक झळकावणारा तो तिसरा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विनोद कांबळीने वयाच्या २१व्या वर्षी दोन द्विशतके झळकावली होती. तर सुनील गावस्कर यांनी वयाच्या २१व्या वर्षी द्विशतक झळकावले होते. आता यशस्वीने वयाच्या २२ व्या वर्षी ही कामगिरी केली आहे.