मुंबई : राज्यात यंदाच्या वर्षी १८ मार्च २०२५ रोजीपर्यंत सीसीआय म्हणजेच कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून ४४ लाख क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य अभिजीत वंजारी यांनी अल्पकालीन चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री रावल बोलत होते. यावेळी सदस्य सदाभाऊ खोत, अमोल मिटकरी, परिणय फुके, अरुण लाड यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून राज्यात कापूस खरेदी केंद्र उघडण्यात येतात आणि त्यांच्याकडूनच कापसाची खरेदी केली जाते असे सांगून मंत्री रावल म्हणाले की, यंदा कापसाला लांब धाग्यासाठी ७ हजार ५२१ रुपये तर मध्यम धाग्यासाठी ७ हजार १२१ रुपये हमीभाव देण्यात येत आहे. कापूस खरेदीसाठी राज्यात १२४ खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. कापूस खरेदीनंतर त्याच्या जिनींग आणि प्रेसिंगची प्रक्रिया केली जाते. त्यासाठी सप्टेंबर ते सप्टेंबर असा करार प्रेसिंगवाल्यांसोबत केलेले असतात. त्यामुळे कापूस खरेदी बंद नसल्याचे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले.
सोयाबीन संदर्भात बोलताना मंत्री रावल म्हणाले की, जवळपास ११ लाख २१ हजार टन सोयाबीन यंदा खरेदी करण्यात आले आहे. त्याशिवाय तूर, मुग, उडीद, हरभरा या पिकांचीही खरेदी हमीभावाने होत आहे. या पिकांनाही चांगला हमीभाव देण्यात येत आहे. शेतक-यांच्या उत्पन्नवाढीसाठी शासन कायमच प्रयत्नशील असून राज्यात सिंचन क्षमतेत वाढ करण्यात येत आहे. सिंचनाच्या चांगल्या सोयी निर्माण झाल्या पाहिजेत. तसेच खासगी बाजार समित्यांच्या बाबत धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहितीही मंत्री रावल यांनी सभागृहात दिली.