लातूर : प्रतिनिधी
गतवर्षाप्रमाणे यंदाही राज्य सरकारने दिवाळी निर्बंधमुक्त्त केल्याने राज्यभरातील नागरिकांनी आपल्या आप्तेष्टांसह दिवाळीहा सण साजरा केला. दिवाळीत प्रवासासाठी हंगामी दरवाढ केल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांनी लालपरीवर विश्वास दाखवला आहे. ८ ते १५ नोव्हेंबर या काळात दिवाळीसाठी सोडण्यात आलेल्या जादा गाडयांमधून सुमारे १० लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. या ८ दिवसांत एसटीला सुमारे ४ कोटी ८५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे सहायक परीवहन अधिकारी अभय देशमुख यांनी दिली.
नोव्हेंबर महिन्यात जोडून आलेल्या सुट्या आणि दिवाळीचा सण पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणा-या प्रवाशांच्या सोईसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात नियमित बसफे-यांबरोबरच दिवाळी स्पेशल जादा गाडया सोडण्याचा निर्णय घेतला होता. दिवाळीच्या काळात दरवर्षीप्रमाणे प्रवासी दरात १० टक्के हंगामी दरवाढ केली जाते. या दरवाढीनंतरही प्रवाशांनी आपल्या लालपरीवर म्हणजेच एसटीवर विश्वास दाखवत प्रवास केला. या नागरिकांनी एसटी महामंडळाने सोडलेल्या जादा गाडयांचा लाभ घेत आपल्या इच्छितस्थळी प्रवास केला आहे. एसटीच्या प्रवास भाडयात दिवाळीच्या काळात वाढ करण्यात आली. त्यानुसार २७ नोव्हेंबरपर्यंत १० टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. त्याचा आर्थिक फटका प्रवाशांना बसला मात्र महामंडळाची दिवाळी झाली.
दिवाळीच्या हंगामात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून प्रवास करणा-या प्रवाशांमुळे एसटी महामंडळ कोटयाधीश झाले आहे. लातूर जिल्हयातील पाच आगारातून जवळपास ०४ कोटी ८५ लाख इतके उत्पन्न झाले आहे. या पाच आगारातून लातूर विभागाला १ कोटी ४७ लाखांचे सर्वाधिक उत्पन्न मिळाले आहे. तर, उदगीर विभागाला १ कोटी १४ लाख, अहमदपूर विभागाला ७६ लाख ३८ हजार, निलंगा विभागाला ७८ लाख ८३ हजार, औसा विभागाला ६८ लाख ५६ हजार असे मिळून दिवाळीच्या आठ दिवसात एसटी महामंडळाला ४ कोटी ८५ लाखाचे उत्पन्न मिळाले असल्याचे सहायक परीवहन अधिकारी अभय देशमुख यांनी सागितले.