पूर्णा : तालुक्यातील चुडावा येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेची ४ लाख रूपयांची रक्कम घेवून जाणा-या २ कर्मचा-यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक देवून अपघात घडवून त्यानंतर ४ लाख रूपयांची रोकड लुटून चोरटे पसार झाल्याची घटना गुरूवार, दि.७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाता पूर्णा -नांदेड रस्त्यावरील गौर शिवारात घडली. या घटनेत बँकेचे कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पूर्णा तालुक्यातील परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चुडावा शाखेत सध्या शेतक-यांचे पिक विम्याचे अनुदान वाटप सुरू आहे. बँकेची रोकड संपल्याने गुरूवारी सकाळी शाखा व्यवस्थापक बळीराम सखारात हानवते व शिपाई शिवराम श्यामराव गायकवाड हे दोघे शहरातील मोंढा बाजारातील मुख्य शाखेतून ४ लाख रूपयांची रोकड घेवून त्यांच्या एमएच २२ एएस ५३७५ दुचाकीवरून चुडावा शाखेकडे निघाले होते. त्यांच्या पाळतीवर असलेल्या दोन चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला. पूर्णा- नांदेड रस्त्यावरील गौर शिवारात चोरट्यांनी पाठी मागून येवून बँक कर्मचा-यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही कर्मचारी खाली पडून गंभीर जखमी झाले. याच वेळी चोरट्यांनी बँक कर्मचा-यांच्या बॅगेतील ४ लाख रूपयांची रोकड हिसकावून धनगर टाकळी फाट्यावरून दुचाकीवरून पसार झाले. जखमींनी घटनेची माहिती बँक प्रशासन व पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच जि.म. बँकेचे वरीष्ठ अधिकारी विठ्ठराव काळे, पो.नि. प्रदिप काकडे, चुडावा ठाणेदार सपोनि. पोमनाळकर, सपोनि. लहाने, जमादार आमेर चाऊस, पोका शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना उपचारासाठी नांदेड येथे पाठवले. पूर्णा, चुडावा पोलिसांनी जागोजागी नाकेबंदी केली असून चोरट्यांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली आहे. या प्रकरणी चुडावा पोलिसांत नोंद झाली असून तपास चुडावा ठाणेदार सपोनि. पोमनाळकर करत आहेत.