मुंबई : उदय सामंत यांच्या नेतृत्वात सेनेचे २० आमदार भाजपात जाऊ शकतात असा दावा उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर दावोसमध्ये असलेल्या उद्योगमंत्र्यांनी गेल्या १५ दिवसांत किती आमदार आणि खासदार भेटून गेले याचा आकडाच सांगितला आहे.
काल संजय राऊत यांनी माझ्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे उत्तर आज मला द्यायचे आहे, असे उदय सामंत म्हणाले. उद्योगमंत्री असल्याने सामंत दावोस दौ-यावर आहेत. उबाठाच्या ४, काँग्रेसच्या ५ आमदारांनी व उबाठाच्या ३ खासदारांनी मागील १५ दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. याचबरोबर उबाठा गटाचे १० माजी आमदार, काही जिल्हाप्रमुख तसेच काँग्रेसचे काही माजी आमदार-खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत आणि येत्या तीन महिन्यात हे सगळे शिवसेनेत सामील होतील, असा गौप्यस्फोट सामंत यांनी केला आहे. ज्या पक्षाचा अस्त झालाय त्या पक्षाच्या लोकांनी स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी माझा नावाचा वापर करणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे.
जे लोक मागील महिनाभरात एकनाथ शिंदेंना भेटले आहेत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करावा, असा टोलाही सामंत यांनी लगावला आहे. याचबरोबर महाराष्ट्रात होणा-या पाच लाख कोटींच्या गुंतवणुकीवरही सामंत यांनी आज महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस असल्याचे म्हटले आहे. आजच्या दिवसभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सुमारे ५ लाख कोटींची गुंतवणूक आणण्यात यशस्वी झालो आहोत, असे सामंत म्हणाले. मी महाराष्ट्रातून येतानाच सांगितले होते की विक्रमी गुंतवणूक महाराष्ट्रात येईल, असे सामंत म्हणाले.