22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeधाराशिवफेरफारसाठी लाच घेणा-या तलाठ्याला ४ वर्षाचा कारावास

फेरफारसाठी लाच घेणा-या तलाठ्याला ४ वर्षाचा कारावास

धाराशिव जिल्हा न्यायालयाचा सलग दुस-या दिवशीही लाचखोरांना दणका

धाराशिव : प्रतिनिधी
शेत जमिनीचा फेरफार मंडळ अधिका-याला सांगून मंजूर करून धेण्यासाठी शेतक-याकडून २ हजार रूपयांची लाच घेणा-या अणदूर ता. तुळजापूर सज्जाचे तत्कालिन तलाठी धन्वंतर नागनाथ गायकवाड यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी दि. २० जुलै रोजी दोन वेगवेगळ््या कलमान्वये सात वर्षाचा कारावास व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या असल्याने एकूण चार वर्षाचा कारावास तलाठी यांना भोगायचा आहे. सलग दुस-या दिवशी जिल्हा न्यायालयाने लाचखोर कर्मचा-यांना कारावासाची शिक्षा सुनावल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.
या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील सज्जा येथे सन २०१५ मध्ये धन्वंतर नागनाथ गायकवाड हे तलाठी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी तक्रारदार शेतकरी शिवाजी चव्हाण (रा. चव्हाणवाडी ता. तुळजापूर) यांच्याकडून दोन हजार रूपयांची लाच घेतली होती.

शिवाजी चव्हाण यांच्या नातेवाईकाच्या शेत जमिनीचा फेरफार मंडळ अधिकारी यांच्याकडून मंजूर करून घेण्यासाठी तलाठी धन्वंतर गायकवाड यांनी दोन हजार लाचेची मागणी करून पंचासमक्ष लाच स्विकारली होती. यावेळी एसीबीच्या पथकाने त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६४/२०१५ कलम ७, ८, १३(१) (ड) सह १३(२) ला. प्र. अधिनियम, सन १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालिन तपासी अधिकारी आसिफ शेख यांनी करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते. हा विशेष खटला धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांच्या समोर चालला.

आरोपी व सरकारी पक्षाच्या वकीलांची बाजू ऐकून न्यायालयाने २० जुलै रोजी निकाल दिला.

सरकारी अभियोक्ता म्हणून पी. के. जाधव यांनी तर आरोपीचे वकील म्हणून अ‍ॅड. श्री. शिंदे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून एसीबीचे पोलीस निरिक्षक नानासाहेब कदम यांनी काम पाहिले. पैरवी कर्मचारी म्हणून पोलीस शिपाई जे. ए. काझी यांनी सहकार्य केले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी आरोपी तलाठी धन्वंतर गायकवाड यांना कलम ७ अन्वये ३ वर्ष कारावास व १ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस कारावास, तसेच कलम १३(१) (ड), १३ (२) अन्वये ४ वर्ष कारावास व १ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस कारावास, अशी शिक्षा सुनावली. शुक्रवारी व शनिवारी सलग दोन दिवस न्यायालयाने लाच प्रकरणात शिक्षा सुनावली असून लाचखोरांचे विशेषत: लाच प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR