दुबई : वृत्तसंस्था
सौदी अरेबियात झालेल्या भीषण रस्ते अपघातात ४५ भारतीयांचा मृत्यू झाला. मक्काहून मदीनाला जाणा-या त्यांच्या बसने डिझेल टँकरला धडक दिली आणि आग लागली. मृतांमध्ये १८ महिला, १७ पुरुष आणि १० मुले यांचा समावेश आहे. या अपघातातून फक्त एकच व्यक्ती वाचली. त्याचे नाव मोहम्मद अब्दुल शोएब (२४) असे आहे. शोएब ड्रायव्हरच्या शेजारी बसला होता. अपघातानंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले आणि त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मदीनापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुहरसजवळ भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्रीनंतर १.३० वाजता हा अपघात झाला. त्यावेळी अनेक प्रवासी झोपले होते आणि त्यांच्या वाचण्याची शक्यता नव्हती. हैदराबाद पोलिसांच्या माहितीनुसार ९ नोव्हेंबर रोजी ५४ जण हैदराबादहून सौदी अरेबियाला गेले होते. त्यांना २३ नोव्हेंबर रोजी परतायचे होते. त्यापैकी चार जण रविवारी कारने स्वतंत्रपणे मदीनाला गेले होते तर इतर चार जण मक्का येथे राहिले होते. अपघात झालेल्या बसमध्ये ४६ जण होते.
तेलंगणा सरकारने रियाधमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. राज्य सरकारने मृतांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिल्लीतील अधिका-यांना पीडितांची ओळख पटविण्यासाठी आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी दूतावासाशी जवळून समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत.
मृतांमधील १८ जण एकाच कुटुंबातील
मृतांपैकी १८ जण एकाच कुटुंबातील होते, ज्यात नऊ मुले आणि नऊ प्रौढांचा समावेश होता. हे कुटुंब हैदराबादचे होते आणि शनिवारी ते भारतात परतणार होते. मृतांपैकी बहुतेक जण हैदराबादचे असल्याचे मानले जात आहे.
१२ मृतांची ओळख पटली
अपघातात बारा भारतीय बळींची ओळख पटली आहे. त्यात अब्दुल मोहम्मद, मोहम्मद मौलाना, सोहेल मोहम्मद, मस्तान मोहम्मद, परवीन बेगम, झाकिया बेगम, शौकत बेगम, फरहीन बेगम, झहीन बेगम, मोहम्मद मंजूर, मोहम्मद अली आणि गौसिया बेगम यांचा समावेश आहे.

