मुंबई : मुंबईसह मोठ्या शहरात मद्यपान करून आणि ड्रग्जचे सेवन करून वाहने चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस वाढत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ड्रायव्हरची अल्कोहोल चाचणी करण्यात येते. पण ड्रग्ज सेवनाची चाचणी करण्यासाठी उपकरणे नाहीत. यासाठी पुढील तीन महिन्यात परिवहन विभागाच्यावतीने खास उपकरणे घेण्यात येणार आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली.
दरम्यान राज्यात मागील तीन वर्षात रस्ते अपघातात ४५ हजार ९२५ जणांचा मृत्यु झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. राज्यातील रस्ते अपघातांबाबत आमदार काशिनाथ दाते यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळ चर्चेला उत्तर देताना प्रताप सरनाईक म्हणाले की, वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी परिवहन विभागाने २६३ इंटरसेप्टर वाहनांची खरेदी केली आहे. चालक परवान्यांमध्ये अधिक कडक नियमावली अमलात आणण्यात येत आहे.
राज्यात ३८ ठिकाणी स्वयंचलित वाहनचालक चाचणी सुरू आहे. यामध्ये ७० टक्के परवानाधारक अपात्र ठरले आहेत. यापुढे चालक परवान्यांमध्ये अचूकता येण्यासाठी ऑटोमॅटिक टेस्ट ट्रॅकचा उपयोग करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी दंड करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचाही(एआय) उपयोग करण्यात येईल, असेही सरनाईक यांनी सांगितले.
२०२२ ते २०२४ मधील रस्ते अपघात आणि मृत्यु
वर्ष – २०२२ – २०२३ – २०२४
अपघात- ३३,३८३- ३५,२४३, ३६,०८४
मृत्यु- १५,२२४- १५,३६६- १५, ३३५