24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदे गटातील ५-६ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

शिंदे गटातील ५-६ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

मुंबई : दोन वर्षांपूर्वी बंडाचा झेंडा खांद्यावर घेत शिवसेनेमध्ये उभी फूट पाडणा-या एकनाथ शिंदे यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी लढवलेल्या १५ जागांपैकी केवळ ७ जागांवर शिंदेंचे खासदार निवडून आले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचा समावेश असलेल्या महायुतीचीही या निवडणुकीत मोठी पिछेहाट झाली आहे. शिंदे गट या धक्क्यातून सावरत असतानाच आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला मोठा धक्का देऊ शकते अशी माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणूक आणि निकालादरम्यान, शिंदे गटातील ५ ते ६ आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शिंदेसेनेमधील ५ ते ६ आमदार हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटातील एका बड्या नेत्याने केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि निकालांनंतर हे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र हे आमदार कोण आणि कुठल्या भागातील आहेत, याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने १५ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ७ जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. तर आठ जागांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच शिवसेना ठाकरे गटाने २१ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ९ जागांवर त्यांना विजय मिळाला. तर १२ जागांवर ठाकरे गटाला पराभूत व्हावे लागले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR