नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ३१ जानेवारी रोजी हायव्होलटेज ड्राम्यानंतर सोरेन यांना ईडीने अटक केली होती.
ईडीच्या अटकेविरोधात हेमंत सोरेन यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण सुप्रीम कोर्टानं त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. तर त्यांचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांना न्या. संजीव खन्ना, न्या. एमएम सुंदरेश आणि न्या. बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला. यापूर्वी ईडीने बुधवारी आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सोरेन यांची सात तसांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली होती. अटकेची भीती असल्याने त्यांनी राज्यपलांशी भेटून सीएम पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चाचे विधीमंडळ पक्षाचे नेते चंपई सोरेन यांनी शुक्रवारी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय काँग्रेसचे आलमगीर आलम आणि राजदचे सत्यानंद भोक्ता यांनी देखील मंत्रीपदाच्या शपथ घेतल्या.