27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीची ५ महत्त्वाची कारणे!

मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीची ५ महत्त्वाची कारणे!

मुंबई : विशेष प्रतिनिधी
भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बुधवारी (४ डिसेंबर) रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. भाजपच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी (५ डिसेंबर) होणार आहे.

विजयाचे शिल्पकार
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाची जोरदार पिछेहाट झाली होती. देवेंद्र फडणवीसांनी या पराभवाची जबाबदारी स्विकारत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. भाजपा श्रेष्ठींनी त्यांचा राजीनामा फेटाळला. त्यामुळे फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी कायम राहिले. भाजपाच्या या अभूतपूर्व विजयात फडणवीसांचे मोठे योगदान आहे. जागावाटप, बंडखोरांची समजूत, निवडणूक प्रचार या प्रत्येक ठिकाणी फडणवीस आघाडीवर होते.

प्रशासनावर पकड
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार उपमुख्यमंत्री होणार हे जवळपास स्पष्ट आहे. शिवसेनेकडून या पदासाठी एकनाथ श्ािंदे यांचं नाव आघाडीवर आहे. या दोघांनाही प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. त्याचबरोबर आक्रमक नेते अशीही त्यांची ओळख आहे. हे दोन नेते उपमुख्यमंत्री होत असतील तर मुख्यमंत्रीही तितकाच तोलामोलाचा देण्यावर भाजपाचा भर होता. त्यासाठी महाराष्ट्र भाजपामध्ये देवेंद्र फडणवीस हे नाव सर्वात आघाडीवर आहे.

महापालिका निवडणुकांचे आव्हान
मुंबईसह राज्यातील सर्व प्रमुख शहरातील महानगरपालिका तसंच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात होतील. या सर्व निवडणुकांत स्थानिक समीकरणांवर भाजपाची कसोटी लागेल. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अस्तित्व टिकवण्यासाठी झुंजणारा विरोधी पक्ष तसंच नंबर १ वर लक्ष असलेले सहकारी पक्ष या सर्वांना मागे ठेवण्याचं आव्हान भाजपासमोर आहे. हे आव्हान पेलण्यासाठी देवेंद्र फडणवीस हा भक्कम पर्याय भाजपाकडे आहे.

व्हिजन असलेला नेता
राज्याच्या विकासाचं व्हिजन असलेला नेता अशी फडणवीसांची प्रतिमा आहे. त्यांच्या या प्रतिमेचा विधानसभा निवडणुकीत भाजपाला फायदा झाला. विशेषत: शहरी भागात फडणवीसांची प्रतिमा यामुळे अधिक उजळली आहे. आर्थिक आघाडीवर महाराष्ट्राला नंबर १ ठेवण्यासाठी तसंच ‘लाडकी बहीण’ सारख्या कल्याणकारी योजनांमुळे राज्याची आर्थिक घडी बिघडणार नाही ही काळजी नव्या मुख्यमंत्र्याला करावी लागेल. ही जबाबदारी पार पडण्यासाठी अनुभव आणि क्षमता या बाबतीत फडणवीस सरस ठरतात.

संघाचा भक्कम पाठिंबा
विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्यÞा विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान मोठे आहे. लोकसभा निवडणुकीत शांत असलेल्या संघ स्वयंसेवकांनी विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये जागृतीचं मोठं काम केलं. २०२५ साली विजयादशमीच्या दिवशी संघाला १०० वर्ष पूर्ण होतील. या शताब्दी वर्षात संघ मुख्यालय असलेल्या नागपुरातील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असावे ही संघाची इच्छा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह वेगवेगळ्या साधू-संतांचीही फडणवीस ही पहिली पसंती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR