24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयशहिद जवानांची संख्या ५ वर

शहिद जवानांची संख्या ५ वर

कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला

कठुआ : जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर मोठा हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद झाले, तर ५ जवान जखमी झाले. जम्मूमध्ये गेल्या एका महिन्यातील हा सहावा मोठा हल्ला आहे, तर कठुआ जिल्ह्यात महिनाभरातील हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे.

बिलावरमधील माचेडी-किंडली-मल्हार रोडवर हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे. येथे बदनोता गावाजवळ माचेडी-ंिकडली-मल्हार रस्त्यावर लष्कराच्या वाहनातून सुरक्षा दलाचे १० जवान नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. मल्हार रस्त्यालगतच्या टेकडीवर दहशतवाद्यांनी ठाण मांडले होतं. लष्करी वाहन पुढे जाताच दहशतवाद्यांनी आधी ग्रेनेड फेकले आणि नंतर आधुनिक शस्त्रांनी गोळीबार सुरू केला. हल्लामध्ये जवळपास ३ दहशतवादी सहभागी असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. तसेच हल्ल्यावेळी स्थानिक गाईडही दहशतवाद्यांसोबत असण्याची शक्यता आहे. काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, या हल्ल्यात त्यांच्या कॅडरने एम४ असॉल्ट रायफल, स्रिपर, ग्रेनेड आणि इतर शस्त्रे वापरली आहेत.

३ दहशतवाद्यांच्या हत्येचा बदला
दहशतवादी संघटनेने आगामी काळात असे आणखी हल्ले करण्याची शपथ घेतली आहे. हा हल्ला २६ जून रोजी डोडा येथे ३ दहशतवाद्यांच्या हत्येचा बदला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. काश्मीर टायगर्स ही जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवादी संघटना आहे. यापूर्वी या संघटनेने जम्मू भागातील कठुआ, रियासी आणि डोडा येथेही हल्ले केले होते.

बसवर दहशतवाद्यांनी केला हल्ला
९ जून रोजी रियासी जिल्ह्यातील शिव खोडी मंदिरातून भाविकांना घेऊन जाणा-या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर बस दरीत पडली. यामध्ये ९ जणांना जीव गमवावा लागला, तर ४१ जण जखमी झाले.

दहशतवाद्यांचा शोध सुरू
दहशतवादी हा हल्ला केल्यानंतर जंगलात पळून गेले. शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलाच्या आणखी तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. कठुआ जिल्ह्यात महिनाभरातील हा दुसरा मोठा हल्ला आहे. यापूर्वी १२ आणि १३ जून रोजी अशाच चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले होते आणि एक सीआरपीएलजवान शहीद झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR