अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एका मांजरीला वाचवण्याच्या नादात ५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विहिरीमध्ये पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी शोषखड्ड्यात बुडून मृत्यू झाला. नेवासा तालुक्यातील वाकडी गावामध्ये ही घटना घडली आहे. बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये पडलेल्या मांजरीला वाचवण्यासाठी एकजण उतरला होता.
तो बुडत असल्याने इतरांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि एक-एक करत सहाजण या बायोगॅसच्या खड्ड्यात उतरले. बायोगॅसचा हा खड्डा शेणाने भरलेला होता. त्यामुळे विषारी वायू निर्माण झाल्याने खड्ड्यात उतरलेल्या ६ पैकी ५ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. यापैकी एकाला वाचवण्यात यश आले असून त्याच्यावर नगर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
शेण, जनावरांचे मलमूत्र जमवलेल्या जुन्या विहिरीतील गाळामध्ये एक पाळीव मांजर पडली. या मांजरीला वाचविण्याच्या प्रयत्नात एकामागून एक अशा ५ जणांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. विहिरीतील विषारी वायूमुळे बेशुद्ध होऊन सहा जण विहिरीत पडले. त्यांच्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले. वाकडी येथे मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृतदेह बाहेर काढण्याचे काम आज पहाटे उशिरापर्यंत सुरू होते. मरण पावलेल्यांमध्ये बबलू काळे (वय २८ वर्षे), अनिल काळे (वय ५५ वर्षे), माणिक काळे (वय ६५ वर्षे), संदीप काळे (वय ३२ वर्षे), बाबासाहेब गायकवाड (वय ४० वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. नगर येथील रुग्णालयात विहिरीत बुडालेल्यांपैकी वाचवण्यात यश आलेल्या विजय काळे (वय ३५ वर्षे) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वाकडी येथील अनिल काळे यांच्या शेतावर वस्तीलगत एक जुनी विहीर आहे. कमी खोली असल्याने त्यामध्ये जनावरांचे शेण, मलमूत्र साठवले होते. या विहिरीमध्ये मांजर पडले. त्याला वाचविण्यासाठी विशाल ऊर्फ बबलू काळे विहिरीत उतरला. तो बाहेर आला नसल्याचे लक्षात आल्यावर त्याचे वडील अनिल काळे विहिरीत उतरले. तेही विहिरीमधून वर आले नाहीत, हे पाहून शेजारच्या शेतात असलेले बाबासाहेब गायकवाड त्यांच्या मदतीसाठी विहिरीत उतरले. तेही वर आले नाहीत. अनिलचे चुलत भाऊ संदीप काळे हे रस्त्याने जात होते. त्यांना आवाज आल्याने मदतीला विहिरीत उतरले. तेही वर आले नाहीत.
हे पाहून त्यांचे वडील माणिक काळे विहिरीत उतरले. तेही बेशुद्ध होऊन गाळात पडले. या दरम्यान विजय काळे कमरेला दोर लावून विहिरीत उतरला. विषारी वायूची लक्षणे जाणवताच त्याने आवाज दिला. लोकांनी त्याला वर काढले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांमध्ये काळे कुटुंबातील ४ पुरुषांचा समावेश आहे. शेती हा या कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय आहे. घरातील सर्वच करते पुरुष गेल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ही माहिती मिळताच महिलांनी टाहो फोडला. गुढीपाडव्याच्या दिवशीच झालेल्या या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.