कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात अन्नातून विषबाधा झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कागल तालुक्यातील चिमगावमध्ये अन्नातून विषबाधा होऊन सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे. याशिवाय करवीर तालुक्यातील मांढरे गावामध्येही अन्नातून विषबाधा झाल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अन्नातून विषबाधा झाल्याने पाच जणांना प्राण गमवावे लागल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कागलमधील चिमगावमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याने चिमुकल्या भावा-बहिणीचा मृत्यू झाला.
एका नातेवाईकाने आणलेल्या कप केकमधून त्यांना ही विषबाधा झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच पोलिसांनी अगदी दफन केलेला मृतदेह बाहेर काढून तपासणीसाठी नमुने पाठवले आहे. मरण पावलेल्या चिमुकल्याचे नाव श्रीयांश असे आहे. पोलिसांनी श्रीयांशचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला असून नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत.
त्याचबरोबर श्रीयांशची बहीण काव्याच्या मृतदेहाचेही शवविच्छेदन करण्यात आले आहे. या दोन्ही बहीण-भावाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. दोघांच्या मृत्यूच्या कारणाचे निदान करण्यासाठी व्हिसरा तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
करवीर तालुक्यात तिघांचा मृत्यू
दुसरीकडे करवीर तालुक्यातील मांढरे गावामध्येही विषबाधेमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही प्रकरणे समोर आल्यानंतर कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारे आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या प्रकरणांमध्ये विशेष लक्ष घातले आहे.
दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत दोन्ही घटनांत विषबाधेसाठी कारणीभूत ठरलेले अन्न नेमके कुठून आले होते? त्याचं उप्दान कुठे झाले होते? याची चौकशी सध्या पोलिसांकडून केली जात आहे. दरम्यान, काहीही कारण नसताना चिमुकल्यांनी प्राण गमवल्याच्या वृत्ताने पंचक्रोषित हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.