22.8 C
Latur
Thursday, February 22, 2024
Homeनांदेडभीषण अपघातात ५ जण ठार

भीषण अपघातात ५ जण ठार

१ गंभीर व ४ जण किरकोळ जखमी एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

भोकर : भोकर येथून उमरीकडे जात असलेल्या चार चाकी वाहनाच्या चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन हाळदा-मोघाळी गावाच्यामध्ये असलेल्या शिवारातील तलावाच्या नदीवरील पुलावरुन नदीत कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेत असताना दोघींचा मृत्यू झाला आहे. तर १ जण गंभीर व ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

भोकर येथील एका नातेवाईकाच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून तेलंगणा राज्यातील नवीपेठ येथे चार चाकी वाहनाने दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी १० जण परत जात असताना त्या वाहनाच्या चालकाचा गतीवरील ताबा निसटला व रात्री ११:०० वाजताच्या दरम्यान भोकर उमरी रस्त्यावरील हाळदा-मोघाळी ता. भोकर या गावाच्या मधील शिवारात असलेल्या तलावाच्या नदीवरील पुलावरुन ते वाहन नदीत कोसळले.रात्रीची वेळ व नाल्यात पाणी असल्याने त्या वाहनातील प्रवाशांना बाहेर निघण्यास मोठा अडथळा निर्माण झाला. त्यातील काही जणांनी आरडाओरड केल्याने मोघाळी व हाळदा येथील काही नागरिक मदतीसाठी धाऊन गेले. तसेच त्यांनी झालेल्या भीषण अपघाताची माहिती भोकर पोलिस ठाण्यात कळवली.

ही माहिती मिळताच पो.नि.सुभाचंद्र मारकड, महिला सहाय्यक पो.नि.कल्पना राठोड, सहा.पो.उप.नि.दिलीप जाधव,सहा.पो.उप.नि.संभाजी देवकांबळे,जमादार रवि मुधोळे,पो.ना.परमेश्वर कळणे,पो.कॉ.लहु राठोड,पो. चालक मंगेश क्षिरसागर व सामाजिक कार्यकर्ते जुनेद पटेल, सुलेमान शेख, शाहरुख खान यांची टीम घटनास्थळी पोहचली व तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मदतीने जखमींना त्या वाहनातून बाहेर काढले असता नाका-तोंडात पाणी गेल्याने गुदमरुन यातील सविता श्याम भालेराव (३०),प्रिती परमेश्वर भालेराव (८)दोघी ही रा.रेणापूर ता.भोकर व सुशिल मारोती गायकवाड(९) रा.रामखडक ता.उमरी या तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. तर जखमींना भोकर शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर रेड्डी व त्यांच्या मदतनीस परिचारिकांनी तात्काळ प्रथमोपचार केला.

तसेच गंभीर जखमी झालेल्या रेखाबाई परमेश्वर भालेराव(३०),अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव(२८),श्याम तुकाराम भालेराव (३५) तिघे ही रा. रेणापूर ता. भोकर यांना पुढील अधिक उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले.परंतू नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी उपरोक्त दोघींचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. तर जखमी श्याम तुकाराम भालेराव यांच्यावर तेथे उपचार सुरु आहेत.तसेच जखमी दत्ता ज्ञानेश्वर भालेराव (९),प्रितेश परमेश्वर भालेराव (८),सोहम ज्ञानेश्वर भालेराव (७), ज्ञानेश्वर तुकाराम भालेराव(२८) सर्वजण रा.रेणापूर ता.भोकर यांच्यावर भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. मयत व जखमी सर्वजण हे एकाच कुटुंबातील असून मयत तिघी या सख्ख्या जावा आहेत.सदरील दुर्दैवी अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याने रेणापूर गावावर शोककळा पसरली आहे.उत्तरीय तपासणी नंतर दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी मयत ५ जणांवर रेणापूर ता.भोकर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.तसेच पुढील तपास व कारवाई पो.नि.सुभाचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर पोलिस करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR