चोंडी/मुंबई : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून चोंडी (जि अहिल्यानगर) येथे आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत राज्यातील ७ तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५ हजार ५०३ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचे जतन आणि संवर्धनासाठी ६८१. ३२ कोटी, अष्टविनायक गणपती मंदिरांच्या जिर्णोद्धारासाठी (लेण्याद्री वगळता) १४७.८१ कोटी, श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा १ हजार ८६५ कोटी, श्री क्षेत्र जोतीबा मंदिर विकास आराखडा २५९.५९ कोटी, नाशिकमधील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा २७५ कोटी, कोल्हापूर श्री क्षेत्र महालक्ष्मी विकास आराखडा १ हजार ४४५ कोटी, नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूरगड विकास आराखडा ८२९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
राज्य विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच आज चोंडी येथे म्हणजेच ग्रामीण भागात राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात अहिल्यानगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
सोबतच मुलींचे स्वतंत्र आयटीआयदेखील असणार असल्याचे ते म्हणाले. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश द्यायचा, यासाठी यशवंत योजना सुरु केली आहे. आता १० हजार विद्यार्थी आपण यातून शिकवणार आहोत. सोबतच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजना सुरु करत आहोत.अशी महत्वपूर्ण घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
राज्यात आदिशक्ती अभियान राबविणार
राज्यात महिला सक्षमीकरणासाठी सरकार आदिशक्ती अभियान राबवणार आहे. समाजात संवेदनशीलता निर्माण करणे आणि जागृती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. जे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले तेच काम आमचे सरकार करणार आहे. यासोबतच अहिल्यादेवींचे जीवन आणि कार्याचा सन्मान झाला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अहिल्यादेवी होळकरांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित मराठीसह बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट निर्मिती करण्यास मंगळवारी चोंडी येथे झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच अहिल्यानगरमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
३४ जलाशयांचे संवर्धन
अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या विहिरींचे जलसंधारण विभागाने पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये १९ विहिरी, ६ कुंडांसह ३४ जलाशयाच्या संवर्धनाचे काम केले जाणार आहे. यासोबतच अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दीनिमित्त डाक तिकीटसह प्रेरणा गीतही जारी केले.