नवी दिल्ली : दिल्लीच्या तिहार कारागृहात बनावट पद्धतीने भरती करण्यात आलेल्या ५० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तिहार तुरुंगाच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, २०२० मध्ये, दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (डीएसएसबी) मार्फत तिहारमध्ये विविध पदांवर भरती करण्यात आली होती. बायोमेट्रिक पद्धतीने ही भरती करण्यात आली होती. भरतीनंतर, जेव्हा दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने पडताळणी केली तेंव्हा ५० कर्मचाऱ्यांचे बायोमेट्रिक्स आणि फोटो जुळले नाहीत. ३० नोव्हेंबर रोजी या सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याची नोटीस (सेवा समाप्तीची सूचना) दिल्यानंतर निलंबित करण्यात आले आहे.
तिहार तुरुंगातून निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ३९ वॉर्डन, ९ सहाय्यक अधीक्षक आणि २ मॅट्रॉनचा समावेश आहे. डीएसएसएसबीचा अंतिम अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर आता तिहार तुरुंगात विविध पदांवर फसवणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. डीएसएसबीने नंतर पडताळणी केली तेंव्हा ५० कर्मचाऱ्यांचे बायोमेट्रिक्स आणि फोटो जुळले नाहीत. यानंतर विभागात एकच खळबळ उडाली. घाईघाईने तपास करण्यात आला, ज्यामध्ये याबाबत फसवणूक झाल्याची माहिती समोर आली. यानंतर या सर्वांवर कडक कारवाई करून ३० नोव्हेंबर रोजी एक महिन्याची नोटीस देऊन त्यांना निलंबित करण्यात आले.
दोन वर्षांपूर्वीही तिहार तुरुंगातील कर्मचाऱ्यांच्या भरतीत फसवणुकीचे प्रकरण समोर आले होते. त्यावेळी ४७ कर्मचाऱ्यांना बनावट पद्धतीने भरती करण्यात आल्याचे समोर आले आहे. कारागृहातील काही कैद्यांच्या मृत्यूनंतर बायोमेट्रिक पडताळणी मोहीम राबवली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी ४७ कर्मचारी होते ज्यांचा डेटा जुळत नव्हता. यानंतर या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.