मुंबई : राखीव निधीचा वापर पायाभूत सुविधांसाठी करण्यात येत असल्यामुळे गेल्या वर्षभरात मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी ५ हजार कोटी रुपयांची घटल्याचे स्पष्ट झाले आहे.
सन २०२१-२२ मध्ये महापालिकेच्या मुदत ठेवी ९२ हजार कोटींहून अधिक होत्या. मात्र, २०२२-२३ मध्ये त्यात घट होऊन त्या ८६ हजार कोटींवर आल्या. या मुदतठेवींबाबतची माहिती ‘वॉचडॉग फाउंडेशन’ या संस्थेने मागवली होती. त्यातून सन २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३च्या मुदतठेवी पाच हजार कोटींनी कमी झाल्याचे आढळले. दरम्यान, २०२३-२४ या आर्थिक वर्षात १५ हजार ६५७ कोटी रुपयांचा निधी पायाभूत विकासकामांसाठी देण्यात येणार आहे.
पालिकेला मार्च २०२२ मध्ये १४ हजार ७५० कोटींचा महसूल मिळाला होता. त्यामुळे पालिकेच्या मुदतठेवी मार्च २०२२ मध्ये ९२ हजार कोटी रुपयांवर पोहोचल्या होत्या. मात्र त्यानंतर या मुदतठेवींना उतरती कळा लागली आहे. २०२२-२३ मध्ये त्यांत घट होऊन त्या ८६ हजार कोटींवर आल्या आहेत.