मुंबई : प्रतिनिधी
महायुतीच्या जागावाटप आता अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत असून, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता फक्त २ जागांचा तिढाच बाकी असल्याचे म्हटले आहे. तसेच त्या कोणत्या जागा आहेत, हे सांगणार नसल्याचेही ते म्हणाले. परंतु प्रत्यक्षात महायुतीने आतापर्यंत २८८ पैकी २३५ जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यामुळे आणखी ५३ जणांना उमेदवारी देणे बाकी आहे. त्यामुळे महायुतीतही मोठा तिढा असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीनेही २५३ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे त्यांचे ३५ उमेदवार जाहीर करणे बाकी आहे. अखेरचा टप्पा असतानाही उमेदवार घोषणा बाकी असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांत वाद कायम असल्याचे चित्र आहे.
महायुतीत सर्व काही आलबेल असल्याचे महायुतीच्या नेत्यांकडून सातत्याने सांगितले जात आहे. परंतु जागावाटपावरून तडजोड, उमेदवारांची आयात, जागांची देवाणघेवाण अद्याप सुरूच आहे. तसेच जागांवरून दावे-प्रतिदावेही असल्याने अजूनही ५३ जागांवरील उमेदवार घोषित करणे बाकी आहे. दरम्यान, याबाबत माहिती देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी महायुतीत जवळपास सगळ््या जागांचे वाटप झाले आहे. मात्र, एक-दोन जागांवरून तिढा असल्याचे म्हटले. महायुतीत जागा वाटपाचा निर्णय खेळीमेळीच्या वातावरणात झाला आहे. महायुतीची यादी आम्ही जिंकण्यासाठी जारी केल्याचे बावनकुळे म्हणाले.
महायुतीचे २८८ पैकी २३५ उमेदवार जाहीर
महायुतीत भाजपने पहिल्या यादीत ९९ आणि दुस-या यादीत २२ असे एकूण १२१ उमेदवार जाहीर केले. राष्ट्रवादी अजित पवार गटाने पहिल्या यादीत ३८, दुस-या यादीत ११ आणि तिस-या यादीत ४ असे एकूण ५३ उमेदवार जाहीर केले तर शिवसेना शिंदे गटाने एकूण पहिल्या यादीत ४५ आणि दुस-या यादीत २० उमेदवार जाहीर केले असून महायुतीने एकूण २३५ उमेदवार जाहीर केले आहेत. आणखी ५३ उमेदवारांची घोषणा बाकी आहे.
महाविकास आघाडीचे २५३ उमेदवार जाहीर
महाविकास आघाडीत कॉंग्रेसने सर्वाधिक १०१ उमेदवार घोषित केले आहेत. त्यानंतर ठाकरे गटानेही ८५ उमेदवार घोषित केले असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाने ६७ जागांवरील उमेदवार घोषित केले. त्यामुळे आतापर्यंत २८८ पैकी २५३ उमेदवारांचीच घोषणा केली. आणखी ३५ उमेदवार घोषित करणे बाकी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील वाद अद्याप मिटलेला नाही, असेच चित्र आहे.
शिवसेना-कॉंग्रेसमध्ये १२ जागांवरून वाद?
महाविकास आघाडीत काही जागांवरून सांगली पॅटर्न होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही जागांवरून वाद आहे. मुंबईतील ४ ते ५ जागांवर चर्चा न करताच शिवसेनेने उमेदवार जाहीर केले. तसेच राज्यातही ७ ते ८ ठिकाणी तीच गत झाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये १०-१२ जागांवरून मतभेद वाढले आहेत. वादग्रस्त जागांवर काँग्रेसही आपल्या उमेदवारांना एबी फार्म देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.