नवी दिल्ली : ऑनलाइन गेमिंग व जुगार यातील फरक शोधण्यासाठी सहा राज्यांचे सरकार आणि उच्च न्यायालये प्रयत्न करत आहेत. नशीब व कौशल्यावर आधारित गेमिंगबद्दल अनेक तर्क दिले जातात. पण क्रिकेटमधील ऑनलाइन गेमिंगमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यावर बंदीसाठी अनेकांनी जनहित याचिका दाखल करत ऑनलाइन गेमिंगच्या ब्रँड अॅम्बेसेडरवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही केली जाते.
मात्र गेमिंग कंपन्या मोठमोठे वकील लावून यातून सुटका करून घेताना दिसतात. हायकोर्टातील शपथपत्रांनुसार, गेमिंग कंपन्यांच्या ७ प्लॅटफॉर्मवर देशभरात ५५ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. ते दररोज ५०० कोटींचा, वर्षाला १.८० लाख कोटींचा सट्टा लावतात. नोकरदारांकडून संपूर्ण पगाराची यात उधळपट्टी होतेय. बेरोजगार, महाविद्यालयीन विद्यार्थी खासगी सावकाराकडून कर्ज काढून हा जुगार खेळतात. यातून कर्जाच्या विळख्यात अडकलेले तरुण आत्महत्येचा मार्गही पत्करत आहेत.
नातवाच्या कर्जापायी ३० लाख भुर्दंड
पुण्याचे प्रकाश मुंद्रा कोळशाचे व्यापारी आहेत. त्यांना दोन मुली. वय झाल्याने आता कामे होत नव्हती. म्हणून त्यांनी मदतीसाठी मुंबईतील मोठ्या मुलीचा १८ वर्षीय मुलगा गिरिराज याला व्यवसायात सोबत घेतले. देवाण घेवाणीचे व्यवहारही त्याच्यामार्फत केले जाऊ लागले. मात्र एकदा मुंद्रा बँकेत गेले तर त्यांना धक्काच बसला. कारण खात्यात ३० लाख रुपये कमी होते. विचारणा केली तर गिरिराजने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर खडसावून विचारल्यानंतर त्याने क्रिकेट बेंिटगमध्ये पैसे गमावल्याचे सांगितले.
२२ लाखांच्या कर्जापायी घटस्फोट
हरियाणातील अंजली साहू व पंकज खरे यांचा प्रेमविवाह झालेला. कुटुंबीयांच्या विरोधामुळे ते दिल्लीत राहू लागले. पंकजला हॉटेलात तर अंजलीला विमान कंपनीत नोकरी लागली. कमी कष्टात जास्त पैसे कमावण्याच्या मोहापायी पंकज क्रिकेट सट्टेबाजीत अडकला. यातून पंकजवर २२ लाखांचे कर्ज झाले. यातून नोकरी गेली. पतीचे देणे देण्यासाठी अंजलीलाही ३ ते ४ लाखांचे कर्ज काढावे लागले. मग घरात वाद वाढले. यातून अंजलीने घटस्फोट घेतला. दोनच वर्षांत त्यांचा संसार संपुष्टात आला.